बातम्या
भरदिवसा कोल्हापुरात बिबट्याचा थरार, अणदूरमध्ये पुन्हा हल्ला – एका बैलाचा बळी!
By nisha patil - 12/11/2025 5:28:37 PM
Share This News:
भरदिवसा कोल्हापुरात बिबट्याचा थरार, अणदूरमध्ये पुन्हा हल्ला – एका बैलाचा बळी!
कोल्हापूर : शहरात भरदिवसा बिबट्याने थरकाप उडवल्यानंतर ताज्या घटनेत अणदूर (ता. गगनबावडा) येथील कावळटेक धनगरवाड्यावर बिबट्याने हल्ला करून एका बैलाचा बळी घेतला आहे. शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या मालकीच्या बैलावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले असून, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गगनबावडा वनविभागाचे वनरक्षक प्रकाश खाडे, सूर्यकांत गुरव, वन कर्मचारी, रिस्क्यू टीम आणि पशु अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा बिबट्या पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे अणदूर-धुंदवडे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात बिबट्याने थैमान घातले होते. या थरारक घटनेत बिबट्याने पोलिस, वन कर्मचारी आणि हॉटेल उद्यानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. अचानक बिबट्या आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती.
‘महावितरण’च्या आवारातील ड्रेनेज चेंबरमध्ये तो घुसला आणि तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाने त्याला जेरबंद केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध केले आणि त्यानंतर पिंजऱ्यात ठेवण्यात आले.
या हल्ल्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर हे जखमी झाले असून खोंदल यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बिबट्याच्या सलग हल्ल्यांमुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवत बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
भरदिवसा कोल्हापुरात बिबट्याचा थरार, अणदूरमध्ये पुन्हा हल्ला – एका बैलाचा बळी!
|