ताज्या बातम्या

भरदिवसा बिबट्याचा थरकाप! कोल्हापूरात हल्ल्यानंतर गगनबावड्यातही बिबट्याची दहशत – बैल ठार

Leopard terror in broad dayligh


By nisha patil - 11/13/2025 12:56:06 PM
Share This News:



कोल्हापूर:- कोल्हापूर शहरात भरदिवसा बिबट्याने थरकाप उडवल्यानंतर नागरिकांची भंबेरी उडाली असतानाच आता गगनबावडा तालुक्यातील अणदूर (ता. गगनबावडा) येथील कावळटेक धनगरवाड्यावर बिबट्याने हल्ला करून एका शेतकऱ्याचा बैल ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या मालकीचा बैल जंगलात चरण्यासाठी गेला होता. हरवलेल्या बैलाचा शोध घेताना तो बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून गगनबावडा वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

ट्रॅप कॅमेऱ्यातही बिबट्याची हालचाल स्पष्टपणे दिसून आली असून वनविभागाने या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. अणदूर-धुंदवडे या मार्गावरील प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गगनबावडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कालच कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात भरदिवसा बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली होती. बिबट्याने पोलिस, वनकर्मचारी आणि हॉटेल बागेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने तीन जण जखमी झाले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर यांना दुखापत झाली असून खोंदल यांची प्रकृती गंभीर आहे. बिबट्या ‘महावितरण’च्या आवारातील ड्रेनेज चेंबरमध्ये लपल्याचे आढळून आल्यानंतर तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी बिबट्याला गनच्या साहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आले असून सध्या वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. शहरात आणि गगनबावड्यात सतत दिसणाऱ्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने प्रवास करताना आणि जनावरांना सोडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


भरदिवसा बिबट्याचा थरकाप! कोल्हापूरात हल्ल्यानंतर गगनबावड्यातही बिबट्याची दहशत – बैल ठार
Total Views: 117