राजकीय
सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक पूर्णत्वाला नेणाऱ्या अजितदादांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सेनापती कापशी मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करूया
By nisha patil - 4/2/2026 11:31:17 AM
Share This News:
सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक पूर्णत्वाला नेणाऱ्या अजितदादांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सेनापती कापशी मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करूया
मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
सेनापती कापशी येथील जाहीर प्रचार सभेला अलोट गर्दी
सेनापती कापशी :- महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सेनापती कापशीतील स्मारक क्रांतिकारी मराठा इतिहासाचे जाज्वल्य आहे. हे स्मारक पूर्णत्वाला नेणाऱ्या कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांना विजयी करूया, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सेनापती कापशी ता. कागल येथे मंत्री श्री. मुश्रीफ सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. शिल्पा शशिकांत खोत, सेनापती कापशी पंचायत समितीच्या उमेदवार श्रीमती सुनिता सूर्यकांत माळी व माद्याळ पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार दीपक पुंडलिक सोनार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत उदयबाबा घोरपडे होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, उमेदवार सौ. शिल्पा खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी व्यवसायामध्ये मोठ्या कष्टाने आपली प्रगती केलेली आहे. त्यांच्या द्वेषाने पछाडलेल्या व्यक्तींना या निवडणुकीत नेस्तनाबूत करा.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, कागलच्या विकासासाठी मंत्री मुश्रीफ व समरजितसिंहराजे एकत्र आले. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.आधीच्या समझोत्यातून जिल्हा परिषद निवडणुकीत मीही त्यामध्ये सहभागी झालो. पालिका व जिल्हा परिषद या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्यांना ताकत देण्यासाठी आमची युती असून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, आम्ही तीन नेते काम करणारे आहोत. कामाच्या जोरावर आम्ही मते मागत आहोत. पण कार्यकर्त्यांनी शिथिलता येऊ देऊ नये, गाफील राहू नये. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते मजबुतीकरणावर भर देऊ. दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत. याऊलट परिस्थिती दुसऱ्या बाजूला असून विरोधकांकडे कोणताही विकासाचा अजेंडा नाही.
श्रीमंत उदयबाबा घोरपडे म्हणाले, कै. अजितदादा पवार यांच्या सहकार्याने मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी महान मराठा योध्दे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे भव्य-दिव्य स्मारक उभारले आहे. हे स्मारक पिढ्यानपिढ्या मराठा इतिहासाचे जाज्वल्य तेवत ठेवेल. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केलेले हे काम सुवर्ण अक्षरानी लिहून ठेवण्यासारखे आहे. सूर्य- चंद्र असेपर्यंत हे अतुलनीय स्मारक चिरंतन राहील. अशा नेतृत्वाला पाठबळ देण्याची समाजाची जबाबदारी आहे.
गोकुळ दूध संघाचे संचालक अमरिषसिंह घाटगे म्हणाले, विरोधक रात्री आमच्या कार्यकर्त्यांना भेटून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या व्यक्तीगत द्वेषापोटी आमच्या कार्यकर्त्यांचा आधार घेऊ नका.
माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत म्हणाले, सेनापती कापशी ही शुर-विरांची भुमी आहे. त्यांना साजेल असे काम करण्याची जबाबदारी आमची असुन या परिसरातील खेड्या-पाड्यातील जनता व मंत्री मुश्रीफ यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असून येथून पुढेही काम करणार आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक पूर्णत्वाला नेणाऱ्या अजितदादांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सेनापती कापशी मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करूया
|