बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना मताधिक्य देऊ : आमदार राजेश क्षीरसागर

Let us ensure a lead in votes


By nisha patil - 10/17/2026 4:16:11 PM
Share This News:



पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना मताधिक्य देऊ : आमदार राजेश क्षीरसागर

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात विजयाचा निर्धार; मतदान केंद्रनिहाय नियोजन करण्याच्या सूचना

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे. पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत, मतदान केंद्रनिहाय नियोजन करून डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना विविध सूचना देण्यात आल्या. तसेच डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी बूथनिहाय प्रचार यंत्रणा सक्रिय करण्याचा निर्धार करण्यात आला.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला सध्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पदवीधर मतदारांच्या विविध प्रश्नांची जाण असलेले आणि ते प्रश्न सक्षमपणे सोडविण्याची क्षमता असलेले उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या योग्य उमेदवार आहेत. त्यांच्या माध्यमातून पदवीधर समाजाच्या अपेक्षा विधिमंडळात प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सन २००८ मध्ये तत्कालीन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून शिवसैनिकांना निवडणूक व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आहे. यापूर्वी झालेल्या तीन निवडणुकांमध्ये बूथनिहाय जबाबदाऱ्या शिवसैनिकांनी प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे यंदाही प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम यंत्रणा उभी करून मतदारांशी थेट संपर्क साधण्याची गरज आहे. निवडणुकीसाठी दिवस कमी असले तरी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकाने ‘रात्रंदिवस एक करून’ पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने विकासाची वाटचाल सुरू आहे. देशाची प्रगती होत असताना देशात अस्थिरता निर्माण करणे, गैरसमज पसरविणे आणि देशविघातक कारवायांना खतपाणी घालण्याचे प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन योग्य नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करून विरोधकांचे कुटील डाव उधळून लावण्याची संधी शिवसैनिकांना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. स्मिता जाधव या कोल्हापूरच्या सुनबाई आणि नात असून सामाजिक कार्याची मोठी परंपरा असलेल्या जाधव कुटुंबाचा वारसा त्या पुढे नेत आहेत. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेत डॉ. स्मिता जाधव समाजहितासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या रूपाने जाणकार, उच्चशिक्षित आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व विधिमंडळात पाठविण्यासाठी शिवसैनिक कोणतीही कसर सोडणार नाहीत, असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

मतदान केंद्रनिहाय बैठका घेण्याच्या सूचना

पदाधिकारी व शिवसैनिकांनी मतदान केंद्रनिहाय बैठका घेऊन आपल्या भागातील पदवीधर मतदार याद्यांची तपासणी करावी. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा प्रचार प्रभावीपणे करावा. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे आणि त्यामध्ये डॉ. स्मिता जाधव यांना सर्वाधिक मतदान मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
आपली एकजूट, संघटनशक्ती आणि नियोजनबद्ध प्रचाराच्या माध्यमातून डॉ. स्मिता जाधव यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून कामाला लागावे. पदवीधर मतदारांचा विश्वास संपादन करून निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

चौकट

समाजहिताच्या कामात जाधव कुटुंबीयांचे योगदान अतुलनीय : आमदार क्षीरसागर

जाधव कुटुंबीयांनी विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने भरीव योगदान दिले आहे. देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी आरोग्यसेवेच्या माध्यमातून मदत करण्यापासून ते पूरबाधित नागरिकांना दिलासा देणे, कोविड काळात आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव आणि डॉ. स्मिता जाधव यांनी सातत्याने काम केले आहे.
जाधव कुटुंबीयांचे समाजहिताच्या कार्यातील योगदान अतुलनीय असून, या कार्याची पोहोचपावती पदवीधर मतदार मतदानाच्या माध्यमातून देतील. डॉ. स्मिता जाधव यांच्या सामाजिक कार्याला आणि सक्षम नेतृत्वाला मतदारांचा आशीर्वाद मिळून त्यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार जयश्रीताई जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख,  महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक अंकुश निपाणीकर यांनी केले.

    यावेळी महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण समिती सभापती शिला सौनुले, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक प्रसाद चव्हाण, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 


पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना मताधिक्य देऊ : आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 34