बातम्या
के.एम.टी. ला उर्जितावस्था देण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांवर भर देवू : परिवहन सदस्य रोहन अतिग्रे
By Administrator - 2/25/2026 4:57:25 PM
Share This News:
के.एम.टी. ला उर्जितावस्था देण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांवर भर देवू : परिवहन सदस्य रोहन अतिग्रे
प्रत्यक्ष बस प्रवास करून जाणून घेतल्या प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या समस्या
कोल्हापूर दि.२५ : गेल्या काही वर्षात महानगरपालिका परिवहन विभागाच्या के.एम.टी. उपक्रमास विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्यांचे मूळ शोधून के.एम.टी. उपक्रमास उर्जितावस्था देण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांवर भर देण्यास प्रयत्नशील असल्याचे नूतन परिवहन सदस्य रोहन अतिगे यांनी सांगितले. आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार के.एम.टी प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी परिवहन सदस्य रोहन अतिग्रे यांनी प्रत्यक्ष बस प्रवास केला तसेच केएमटी कार्यालयास भेट देवून कामकाजाची पाहणी केली.
यावेळी प्रवाशांशी संवाद साधताना जेष्ठ नागरिकांनी ६५ वर्षावरील के.एम.टी.प्रवाशांना, जेष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट करावे, अशी प्रमुख मागणी केली. यासह परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस उपलब्ध कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. के.एम.टी बस थांब्यावर प्रवाशांना पाणपोई, बैठक व्यवस्था अशा मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. प्रवासाच्या दृष्टीने बसेस सुस्थितीत व साफसफाई केलेल्या असाव्यात.
विशेष पासेस, मासिक पासेसमध्ये विशेष सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली. यासर्व मागण्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच परिवहन विभागाची सर्वसमावेशक बैठक आयोजित करून या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
यासह के.एम.टी. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना जाणवणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने चालक नसल्यामुळे १७ बसेस बंद अवस्थेत आहेत. प्रवासी संख्या अधिक असल्याने अत्याधुनिक ५० बसेसची आवश्यकता आहे. सफाई कर्मचारी यांची संख्या कमी आहे. चालक आणि वाहक भरती करणे आवश्यक आहे. कार्यालयांची डागडुजी करणे आवश्यक आहे. या प्रमुख बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
याबाबतीत परिवहन विभागाकडून आवश्यक मागणी प्रस्ताव देण्यासाठी पाठपुरावा करून हे प्रश्नही मार्गी लावण्यास सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच के.एम.टी.चे उत्पन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि दीर्घकालीन सुधारणांवर भर देवू, अशी ग्वाही दिली.
नूतन परिवहन सदस्य रोहन अतिग्रे यांनी अचानक केलेल्या या अभ्यासपूर्ण प्रवासाबाबत प्रवासी आणि के.एम.टी. कर्मचाऱ्याकडून विशेष कौतुक केले गेले.
के.एम.टी. ला उर्जितावस्था देण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांवर भर देवू : परिवहन सदस्य रोहन अतिग्रे
|