बातम्या

ग्रंथालय प्रेमी, कुशल प्रशासक ,ज्ञान माऊली : प्राचार्या शुभांगी ताई गावडे

Library lover skilled administrator mother of knowledge


By nisha patil - 2/5/2026 3:34:40 PM
Share This News:



ग्रंथालय प्रेमी, कुशल प्रशासक ,ज्ञान माऊली : प्राचार्या शुभांगी ताई गावडे

 

ग्रंथांवर आणि ग्रंथालयांवरती नितांत प्रेम करणाऱ्या कुशल प्रशासक आणि ज्ञानमाऊली म्हणजे प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे मॅडम होय.  एक उत्तम शिक्षक ,एक उत्तम प्रशासक, एक उत्तम वाचक आणि सुसंस्कारशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे  पाहिले जाते.  वयाच्या 53 व्या वर्षी त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर  मोठी शोककळा पसरली आहे. स्वर्गीय गावडे मॅडम यांच्या कार्याचा या निमित्ताने घेतलेला हा थोडक्यात आढावा. 


शिक्षण महर्षी परमपूज्य बापूजी साळुंखे आणि  प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या विचारांचा वसा आणि वारसा शुभांगी गावडे मॅडम यांनी उत्तम पद्धतीने चालवला . स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कुशल नेतृत्व करत 2008 पासून त्यांनी सचिव म्हणून उत्तम धुरा सांबळी. संस्थेच्या  410 हून अधिक संस्कार  केंद्रांचे त्यांनी उत्तम नेतृत्व केले. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहामध्येही सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केले. 
 

विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालयात त्यांचा सतत वावर असे.ग्रंथालयात आलेली नवनवीन पुस्तके त्या आवर्जून पाहत आणि वाचण्यास घेत असत. शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी वाचन केलेले होते.शिक्षणाबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराला त्यांनी प्राधान्य दिल. महाविद्यालयातील ग्रंथालयातून त्यांनी मानवी जीवनातील गुढ रहस्य, दत्ता अवधूता यावरील सात खंड, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, स्वामी विवेकानंद, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवन कार्यावरील सर्व पुस्तके त्यांनी वाचून काढलेली होती.    एवढेच नव्हे तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात त्यांचे पीएच.डी.चेही संशोधन कार्य सुरू होते. त्या अनुषंगाने संशोधनावरील अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी केले होते. त्याच्या नोट्स ही त्यांनी काढल्या होत्या.भारतातील प्राचीन ज्ञान परंपरा यावरील पुस्तकेही त्यांनी घेतली होती. ग्रंथालयात सतत त्यांचा वावर असे. नवनवीन विषयांवरील पुस्तके मागवण्या संदर्भात त्या सतत सूचना करत असत. ग्रंथालयांचा विकास आणि ग्रंथालयात नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासंदर्भात त्या सतत आग्रही असत.


ग्रंथपाल, प्राध्यापक, शिक्षक,प्रशासकीय सहकारी यांच्यावरती त्यांनी माऊली प्रमाणे माया केली. प्रेम जीवाळा, आपुलकी दाखवली. म्हणूनच त्यांना  ज्ञानमाऊली म्हणून त्यांना संबोधले जाते.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्या सतत प्रयत्नशील असत. त्यांच्यासाठी त्या नवीन नवीन उपक्रम राबवत.न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल व   ज्युनियर कॉलेज मध्ये त्यानी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या सचिव पदाच्या कालावधीत नर्सिंग कॉलेज, लॉ कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट या व इतर अनेक ज्ञान शाखांचा विस्तार झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिक्षक, प्राध्यापक आणि लाखो विद्यार्थी घडलेले आहेत. त्यांच्या विचाराने आणि मार्गदर्शनानेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे सरांची वाटचाल सुरू आहे.
 

परम पूज्य बापूजी आणि प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या विशाल वटवृक्षाच्या छायेखाली असतानाही त्यांनी आपल्या कर्तुत्वाने आणि प्रेमळ स्वभावाने  त्यांनी सर्वांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या अकाली जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शुभांगी ताई गावडे मॅडम यांचे विचार, कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांवरती आहे. बापूजींच्या कार्याचे सतत स्मरण करत शिक्षणाचे हे कार्य अखंडपणे सुरू ठेवणे आणि समाज विचाराने समृद्ध कसा बनेल यावर काम करणे हीच खरी शुभांगी ताई गावडे मॅडम यांना खरी श्रद्धांजली ठरेल. परत एकदा सर्वांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.


डॉ. नीता पाटील 
ग्रंथपाल, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर.


ग्रंथालय प्रेमी, कुशल प्रशासक ,ज्ञान माऊली : प्राचार्या शुभांगी ताई गावडे
Total Views: 16