विशेष बातम्या
"लोकल टू ग्लोबल": आयात-निर्यात करिअरविषयी कार्यशाळेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 11/12/2025 5:42:49 PM
Share This News:
"लोकल टू ग्लोबल": आयात-निर्यात करिअरविषयी कार्यशाळेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाबरोबरच उद्योजकतेला चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, लेव्हलअप अकॅडमी, कोल्हापूर आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकल टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज : एक्स्पोर्ट-इम्पोर्ट" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा कॉलेजच्या सभागृहात पार पडली असून युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अक्षय राणे (EXIM Wala – एक्स्पोर्ट-इम्पोर्ट तज्ज्ञ) यांनी भारतीय युवकांसाठी आयात-निर्यात क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. जागतिक व्यापारातील वाढत्या शक्यता, उद्योगातील आवश्यक कौशल्ये, निर्यात व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया आणि परकीय बाजारपेठेतील मागणी यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणासोबत जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चारही बाजूंनी ज्ञानसंपन्न होण्याची गरज व्यक्त केली.
कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश शेटे, लेव्हलअप अकॅडमीचे संचालक सिद्धार्थ पंडित आणि संचालिका सौ. सलोनी पंडित यांनीही रोजगार, उद्योजकता आणि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट क्षेत्रातील कौशल्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक व्यापार क्षेत्रातील नव्या दिशा आणि करिअरच्या व्यापक संधींबाबत अद्ययावत माहिती मिळून कौशल्यविकासास नवीन गती मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
"लोकल टू ग्लोबल": आयात-निर्यात करिअरविषयी कार्यशाळेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|