बातम्या

मोरेवाडीत कमी व्होल्टेजचा त्रास! नवीन डीपीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

Low voltage issues in Morewadi


By nisha patil - 10/14/2026 9:40:58 AM
Share This News:



मोरेवाडीत कमी व्होल्टेजचा त्रास! नवीन डीपीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

 

मोरेवाडी परिसरातील अष्टविनायक पार्क, मगदूम कॉलनी आणि धन्वंतरी नगरमधील नागरिकांना कमी विद्युत दाब आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवून नवीन विद्युत डीपी बसवावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महावितरणकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या परिसरात गेल्या काही वर्षांत नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, वाढत्या वीजवापराच्या तुलनेत सध्याची विद्युत यंत्रणा अपुरी पडत असल्याने नागरिकांना कमी व्होल्टेज, वारंवार वीज खंडित होणे आणि विद्युत उपकरणांमध्ये बिघाड अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे आणि सहाय्यक अभियंता दीपक मुगडे यांना निवेदन देण्यात आलं. परिसराची तातडीने तांत्रिक तपासणी करून नवीन क्षमतेचा विद्युत डीपी बसवावा, तसेच विद्युत वाहिन्या आणि केबल्सची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मोरेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश हुन्नुरे, उपाध्यक्ष हेमंत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, नागरिकांची ही समस्या लवकरात लवकर दूर न झाल्यास मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल, असा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.


मोरेवाडीत कमी व्होल्टेजचा त्रास! नवीन डीपीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
Total Views: 11