राजकीय

शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!

MLA Kaustubh Gawade firmly pursues the cause of teachers


By nisha patil - 4/11/2026 10:11:14 PM
Share This News:



शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!

जुनी पेन्शन योजना आणि सेवा ज्येष्ठतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर

मुंबई : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी शासनदरबारी आपला ठाम पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह सेवा ज्येष्ठतेसंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या भेटीदरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जुनी पेन्शन योजना, सेवा ज्येष्ठतेतील अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी आमदार गावडे यांनी केली. या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून शिक्षकांच्या भावना आणि अपेक्षा शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सचिन नलवडे उपस्थित होते.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे केवळ संघटनात्मक मागण्यांपुरते मर्यादित नसून ते त्यांच्या सेवासुरक्षेशी, सन्मानाशी आणि भविष्याशी निगडित आहेत. शिक्षकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार कौस्तुभ गावडे यांनी यावेळी अधोरेखित केली.

शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शिक्षण क्षेत्रातील घटकांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, न्याय्य मागण्यांना निर्णयाची जोड मिळेपर्यंत हा लढा सातत्याने सुरू राहील, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!
Total Views: 48