राजकीय

राजारामपुरी परिसरातील रस्ते होणार चकाचक; रु.१० कोटींचा निधी मंजूर — आमदार राजेश क्षीरसागर

MLA Kshirsagars initiative for a pothole free Kolhapur


By nisha patil - 11/11/2025 12:18:32 PM
Share This News:




कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डेमय परिस्थितीवर उपाय म्हणून राजारामपुरी परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी आणि दर्जाहीन कामांमुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी शहर खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला असून, नगरविकास आणि नियोजन विभागाकडून मिळालेल्या या निधीमुळे राजारामपुरी परिसरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण होणार आहे.

प्रसिद्धीपत्रकात क्षीरसागर यांनी सांगितले की, “दर्जेदार रस्ते तयार करणे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे आणि यावर मनपा प्रशासनाचा काटेकोर नियंत्रण असणे आवश्यक आहे. दर्जाहीन काम सहन केले जाणार नाही. कोल्हापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार, टिकावू आणि सुरक्षित रस्ते देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

शहरातील रस्ते सुधारण्यासाठी मनपा, जिल्हा नियोजन समिती निधी, आमदार फंड तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रातील विशिष्ट नागरी सेवा योजना (५ कोटी) आणि नगरविकास विभागाच्या विशेष तरतूदीतून (५ कोटी) असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.


या कामांचा समावेश

  • संजय हॉटेल ते माऊली पुतळा रस्ता

  • जनता बाजार ते मारुती मंदिर रस्ता

  • स्वामी पाणीपुरवठा ते राहुल जाधव घर रस्ता

  • नक्षत्र गार्डन ते बँक ऑफ बडोदा रस्ता

  • कोरगावकर हॉल ते सूर्यकांत पाटील घर रस्ता

  • सावली बंगला ते राजारामपुरी पोलीस ठाणे रस्ता

  • वाचनालय ते तुळशीदास जाधव घर १२वी गल्ली रस्ता

  • प्रसन्न माने घर ते आर.डी. पाटील घर रस्ता

  • संकपाळ घर ते कामगार कल्याण हॉल रस्ता

  • राजारामपुरी ६वी गल्ली ते विक्रम पाटील घर रस्ता

  • सत्यम शिवम आनंद अपार्टमेंट परिसर रस्ता

  • भीमा स्विमिंग टँक ते राधेय क्रीडा मंडळ रस्ता


 

 


राजारामपुरी परिसरातील रस्ते होणार चकाचक; रु.१० कोटींचा निधी मंजूर — आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 25