बातम्या

विभागीय क्रीडा संकुलातील  शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंती

MLA Satej Patil requests the Guardian Minister


By nisha patil - 8/28/2025 10:59:48 PM
Share This News:



विभागीय क्रीडा संकुलातील  शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंती

कोल्हापूर :  छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलमध्ये नेमबाजीचा सराव करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी असतात. येथील शुटिंग रेंज सर्वसामान्य घरातील खेळाडूंना परवडणारी आहे.  त्यामुळे या शूटिंग रेंजचे खासगीकरण करु नका अशी विनंती काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

पत्रात म्हंटले आहे की, विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजमध्ये अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने शासनाकडून नेमबाजी रेंजचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सध्या चालू असलेल्या शासकीय रेंजची फी सर्वसामान्य खेळाडूंना परवडणारी आहे. मात्र खाजगीकरण झाल्यास नवनवीन सोयींच्या नावाखाली भविष्यात फीमध्ये अनियमित वाढ होऊन त्यावर शासनाचे नियंत्रण राहणार नाही. विभागीय रेंजमधील ९५ टक्के लेन खाजगी अकॅडमीस दिल्यास कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंचे मोठे नुकसान होईल.

नेमबाजी हा वैयक्तिक खेळ असल्याने खेळाडूंना सराव, योगा, मेंटल ट्रेनिंग, सायकोलॉजी, फिजिकल ट्रेनिंग यामध्ये स्वतःच्या गरजेनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. खाजगी अकॅडमीकडून यामध्ये सक्ती होऊन मानसिक व आर्थिक खच्चीकरण होण्याची भीती आहे. 
 

त्यामुळे नेमबाजी खेळाडूंच्या हरकतींचा गांभीर्याने विचार करुन छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील  शुटींग रेंजचे खाजगीकरण करु नका अशी विनंती आमदार पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.


विभागीय क्रीडा संकुलातील  शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंती
Total Views: 98