बातम्या
माधुरी नांदणी मठातच राहणार! पेटाची याचिका फेटाळली; २५ हजारांचा दंड!
By nisha patil - 9/10/2026 7:36:15 PM
Share This News:
माधुरी नांदणी मठातच राहणार! पेटाची याचिका फेटाळली; २५ हजारांचा दंड!
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. माधुरी हत्तीणीला पुन्हा जामनगर येथील वनतारामध्ये पाठवण्याची मागणी करणारी पेटा संस्थेची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच, संस्थेला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावत ही रक्कम माधुरीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत.
माधुरीला नांदणी मठात परत आणल्यानंतर साखळदंडांनी बांधून एकाकी ठेवण्यात आल्याचा दावा पेटाने याचिकेत केला होता. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून माधुरीला पुन्हा वनतारामध्ये पाठवण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पेटाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली.
वनतारा, महाराष्ट्र शासन आणि नांदणी मठाच्या वतीने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळली. या निर्णयामुळे माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार असल्याचे मठाच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे. माधुरी हत्तीणीच्या प्रकरणातील या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
माधुरी नांदणी मठातच राहणार! पेटाची याचिका फेटाळली; २५ हजारांचा दंड!
|