राजकीय
*महाशिवरात्रीची रामतीर्थ यात्रा उत्साहात संपन्न-भक्तांची मोठी गर्दी
By Administrator - 2/16/2026 6:25:22 PM
Share This News:
*महाशिवरात्रीची रामतीर्थ यात्रा उत्साहात संपन्न-भक्तांची मोठी गर्दी
*आजरा(हसन तकीलदार) :-आजरा शहराजवळील असणाऱ्या प्रसिद्ध आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या रामतीर्थाच्या परिसरात महाशिवरात्री यात्रेला रविवारी सुरवात झाली.सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता.
रामतीर्थावरील राम मंदिर, महादेव मंदिर, दत्तमंदिर यामध्ये भाविकांनी रविवारी सकाळ पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी हिरण्यकेशी नदीमध्ये स्नान करुन मंदिरातील देवदेवतांचे दर्शन घेतले. रामतीर्थासह खेतोबा व गजरगाव येथील लकमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक काढुन यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली रामतीर्थ ही आजऱ्यातील भूमी आहे.येथील महादेव मंदिरात एकाच दगडातून कोरलेला नंदी लोकांचे खास आकर्षण आहे. तर हिरण्यकेशी नदीकाठावर राम मंदिर आहे. राम मंदिरात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती आहेत. त्याच्याशोजारीच पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणाभिमुख पिंपळ्या मारुतीचे मंदिर आहे. हवा, पाणी,निसर्ग सौदर्य, हिरवागार नदीकाठ, साद घालणारा धबधबा, निसर्गाची जैवविविधता अशा विविध पैलूनी सजलेले हिरण्यकेशी नदी काठावरील रामतीर्थ हे पर्यटन स्थळ आहे. यात्रेला रविवारपासून सुरवात झाली होती भाविकांनी सकाळी हिरण्यकेशी नदीत स्नान करुन दुपारनंतर महादेव व राम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.यात्रेनिमित्त नगरपंचायत कर्मचऱ्यांनी मंदिरात नारळ ठेवून गाऱ्हाणे घालण्याचा व
राम व महादेव मंदिर परिसरात स्वच्छता,प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम केला.रंगरंगोटी आणि परिसर स्वच्छ केल्यामुळे परिसर मनमोहक वाटत
होते. परिसर स्वच्छता, पार्किंग व्यवस्था, वीज व्यवस्था, वैद्यकीय सेवा, एस. टी. ची सोय, मिठाई, खेळणी,शीतपेये, चहा नाश्ता सेंटर, मेवा, फळे, झोपाळे, मनोरंजनाचे खेळ इ. दुकाने अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध मांडली होती. त्यामुळे यात्रेकरूंना आणि भक्तांना खरेदीचा आनंद घेता आला. सोमवारी दुपारनंतर आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात भक्तीभावाने पालखी मिरवणूक रवळनाथाच्या नावानं चांगभलं च्या घोषणा देत यात्रास्थानाकडे रवाना झाली.त्याठिकाणी राम मंदिर आणि महादेव मंदिरात श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घालून प्रसाद वाटण्यात आला. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या ठिकाणी संयोजकामार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शानिवारीही दिवसभर भाविकांनी महादेव
मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, पिंपळ्या मारुती मंदिर या ठिकाणी गर्दी केली होती.
बाल गोपालांनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटला तर भविकांनी अगदी मनोभावे दर्शन घेतले. एकूणच अगदी भक्तीमय आणि आनंदी वातावरणात महाशिवरात्रीची रामतीर्थ यात्रा संपन्न झाली.
*महाशिवरात्रीची रामतीर्थ यात्रा उत्साहात संपन्न-भक्तांची मोठी गर्दी
|