राजकीय
महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल करणार अभियान – उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील
By nisha patil - 10/9/2025 7:39:20 PM
Share This News:
भुदरगड : भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला करडवाडी पंचक्रोशीतील पाचर्डे, करडवाडी, निश्नप, पारदेवाडी, कुंभारवाडी गावातील सरपंच तसेच प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी वनविभागावर विलास बार्डेस्कर यांनी प्रश्नांचा भडीमार केला. उत्तर देताना विभागीय अधिकाऱ्यांची दमछाक झाली. एमएसईबीचे वरिष्ठ अधिकारी संबोधित करत असताना शिवसेना विभागीय नेते महादेव पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर देत स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध दर्शविला. ग्रामपंचायत सदस्य संदीप खतकर यांनी आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली. माजी सरपंच विलास बेलेकर यांनी एसटी प्रवास मोफत असला तरी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची जागा न मिळाल्याने होणाऱ्या गैरसोयीवर उपाययोजना करण्याची सूचना केली.
संजय गांधी निराधार योजनेच्या माजी अध्यक्षा व शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर कृषी विभागाच्या कामाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. शासनाचा पगार घेताना शासकीय कर्मचाऱ्यांनी जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी, एका बाजूला अभियान राबवायचे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसांना ऑफिसची सतत धावपळ करायला लावायची, मग हे महाराजस्व समाधान अभियान कसले? असा परखड सवाल प्रकाश पाटील यांनी आक्रमक भाषेत केला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख सर्कल अधिकारी स्मिता भोपळे होत्या. तसेच तलाठी सुप्रिया भांगे, अनंत कांबळे, नितीन कोळी, विनायक नाईक, दत्तात्रय माने, संपदा कोपर्डीकर यांच्यासह महसूल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरात पारदेवाडीच्या सरपंच संगीता रेडेकर, करडवाडीचे सरपंच विनोद कांबळे, पाचर्डे सरपंच शोभा पाटील, नॅशनलचे उपसरपंच संदीप रावळ, सदाभाऊ बेलेकर, बजरंग सुतार, उत्तम माने, शिवसेनेचे महादेव पाटील, करडवाडीचे उपसरपंच सागर खतकर, प्रकाशराव बेलेकर, नामदेवराव खतकर, विलास दादा बेलेकर, अजित बेलेकर तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विशेष बाब म्हणून गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत भालेकरवाडी येथील पावर विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या मारुती नारायण भालेकर यांच्या पत्नी स्वभावताई मारुती भालेकर यांना दोन लाख रुपयांचा धनादेश शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सर्कल अधिकारी स्मिता भोपळे, कृषी सहाय्यक विठ्ठल चव्हाण, विलास बेलेकर, बजरंग सुतार, सागर खतकर, विनोद कांबळे व उत्तम माने यांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच सुरज आनंदा मेणे (दोनवडे) याचा सवत कडा येथे खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांना – बाळू मेणे (वेंगरूळ) यांनाही दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
या संपूर्ण शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी कृषी खात्याचे आभार मानले.
महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल करणार अभियान – उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील
|