बातम्या

दिनांक 04/05/2026 रोजी महाराष्ट्र संघर्ष समिती,

Maharashtra Struggle Committee


By nisha patil - 5/5/2026 11:10:44 AM
Share This News:



 

महाराष्ट्र संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा /शहर यांचे निवेदन


दिनांक 04/05/2026 रोजी महाराष्ट्र संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शहर यांच्या वतीने पन्हाळा येथील ऐतिहासिक किल्ला परिसरातील बेकायदेशीर बांधकामांच्या संदर्भात प्रांताधिकारी पन्हाळा तालुका तसेच मुख्याधिकारी पन्हाळा नगरपालिका यांना निवेदन सादर करण्यात आले.


सदर निवेदनामध्ये पन्हाळगड हा ऐतिहासिक व संरक्षित वारसा स्थळ असून, केंद्रीय पुरातत्त्व विभाग (ASI) व राज्य शासनाच्या नियमांनुसार येथे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीदेखील किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हॉटेल्स, फार्महाऊस व इतर बांधकामे उभी राहिल्याचे निदर्शनास आले आहे.


तसेच समितीने प्रशासनाच्या एकतर्फी कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही व्यक्तींनी धार्मिक भावनांचा विषय पुढे करून, मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांबाबत चुकीचा व दिशाभूल करणारा प्रचार करत निवेदने देऊन प्रशासनावर दबाव निर्माण केल्याचे समितीने नमूद केले आहे. अशा प्रकारे निवडक कारवाई करत प्रशासनाने तत्काळ हालचाल केल्याने निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


समितीच्या मते, पन्हाळा परिसरात सुमारे 500 ते 600 पर्यंत विविध बांधकामे—ज्यात काही प्रभावशाली व्यक्ती व शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे—अनधिकृत स्वरूपात अस्तित्वात आहेत. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी  अशा प्रकरणांवर कारवाई करून उर्वरित अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.सध्या पोलीस व महसूल प्रशासनाकडून रात्रीचा दिवस करत युद्धपातळीवर कारवाई सुरू असून, ही कारवाई एकतर्फी व निवडक पद्धतीने होत असल्याचा जाहीर निषेध महाराष्ट्र संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.


महाराष्ट्र संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, पन्हाळगड परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामांवर समान व निष्पक्ष कारवाई होईपर्यंत समितीचा लढा सुरू राहणार आहे. या वेळी महाराष्ट्र संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी, वाळवा तालुका अध्यक्ष रामचंद्र सोनवणे, कोल्हापूर शहराध्यक्ष फजल मुजावर, युसूफ शेख, सनी मुल्ला, सज्जाद मुजावर, आरिफ शेख, असिफ मुजावर, इमरान मुलाणी, सलमान नाईकवडे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


महाराष्ट्र संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा /शहर यांचे निवेदन
Total Views: 27