बातम्या
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती : विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी ३६ वर्षांची लढाई
By nisha patil - 6/12/2025 1:20:30 PM
Share This News:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली तीन दशकांहून अधिक काळ समाजातील शोषण, फसवणूक आणि दिशाभूल घडविणाऱ्या अंधश्रद्धांविरुद्ध निःस्वार्थपणे कार्यरत आहे. अंधश्रद्धेमुळे पीडित झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देणे, तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण आणि त्याचा व्यापक प्रसार करणे हे संस्थेचे मूलभूत ध्येय आहे. विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि तर्काधिष्ठित मूल्यांवर आधारलेला समाज घडवण्याच्या कटिबद्धतेतून संस्थेची सर्व कार्यपद्धती लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीतच राबविली जाते.
अंधश्रद्धेविरुद्धची संघटित आणि सातत्यपूर्ण मोहीम
समितीच्या दीर्घ अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे की भोंदूबुवा, अघोरी प्रथा आणि अमानुष रूढींमुळे समाजातील शोषण अधिक तीव्र स्वरूपात घडत असते. या पार्श्वभूमीवर अशा कृत्यांना आळा बसावा, सामाजिक फसवणूक थांबावी आणि दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणता यावे, या उद्देशाने संस्थेने १९९५ पासून जादूटोणा व बुवाबाजीविरोधी कायद्याची मागणी सातत्याने केली.
अखेरीस १८ वर्षांच्या संघर्षानंतर, आणि संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निघृण हत्येनंतर महाराष्ट्र शासनाने २६ डिसेंबर २०१३ रोजी ‘जादूटोणाविरोधी कायदा’ मंजूर केला. परंतु कायदा मंजूर झाल्यानंतरही संस्थेची लढाई थांबली नाही; उलट गेल्या बारा वर्षांत कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध सर्वधर्मीय भोंदूबुव्यांच्या भंपकपणाचे पर्दाफाश करून, त्यांच्यावर या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनेची प्रभावी कामगिरी
कोल्हापूर जिल्ह्यात समितीच्या १३ शाखा सक्रियपणे कार्यरत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टी रुजविण्यासाठी “वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प” राबविला जातो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विवेकवाद, तर्कबुद्धी आणि वैज्ञानिक शिक्षण यांचा प्रसार करण्यासाठी ‘विवेकवाहिनी’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. या उपक्रमांमुळे तरुण पिढीत चिकित्सक विचारसरणीची जाणीव लक्षणीयरीत्या वाढत आहे.
अंधश्रद्धेच्या वाढत्या घटनांवर तात्काळ प्रतिसाद
अलीकडील काळात जिल्ह्यात अंधश्रद्धांशी संबंधित घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आढळते. अशा घटना घडल्यानंतर संस्थेचे कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी जाऊन पीडितांना मानसिक आधार देतात, समाजाचे प्रबोधन करतात आणि आवश्यक असल्यास पोलिसांत तक्रार नोंदविण्यास सहाय्य करतात. ही तत्परता आणि संवेदनशीलता समाजातील पीडितांना सुरक्षिततेची खात्री देते.
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेचे सहकार्य
जिल्ह्यातील भोंदूबुव्यांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत योग्य कारवाई व्हावी, यासाठी समितीतर्फे मा. जिल्हा पोलिस अधीक्षकांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणाची गरज ओळखून, हे प्रशिक्षण संघटनेतर्फे विनामूल्य पुरविण्याची तयारीही प्रशासनाला कळविण्यात आली आहे.
कायद्याची अंमलबजावणी, पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया आणि पीडितांचे संरक्षण या बाबतीत संस्थेचा अनुभव प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती : विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी ३६ वर्षांची लढाई
|