बातम्या
महास्ट्राईड उपक्रमातून राज्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा : आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 5/13/2026 8:10:05 AM
Share This News:
महास्ट्राईड उपक्रमातून राज्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा : आमदार राजेश क्षीरसागर
मुंबई : जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या “महास्ट्राईड” उपक्रमातून राज्यातील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती देण्यात येणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
राज्यातील पर्यटन विकासासाठी संस्थात्मक चौकट अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने “डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन (DMO)” स्थापन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे डी.एम.ओ. कार्यान्वयन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, महास्ट्राईड उपक्रमाद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आर्थिक विकासाचे इंजिन बनविण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करत रोजगारनिर्मिती व शाश्वत विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यास धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा समृद्ध वारसा लाभला असून, या सर्व स्थळांचा एकात्मिक विकास करून कोल्हापूरची जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत DMO ची संकल्पना, प्रशासन व्यवस्था, कायदेशीर चौकट, महसूल व शाश्वतता मॉडेल, खासगी क्षेत्राचा सहभाग, इव्हेंट इकॉनॉमी विकास तसेच पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्रातील कौशल्य विकास आराखड्यांवर विशेष चर्चा करण्यात आली.
या बैठकीस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महास्ट्राईड प्रकल्प संचालक अमन मित्तल, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव संजय जगन्नाथ खंदारे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी नेहा गुप्ता तसेच एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने उपस्थित होते.
महास्ट्राईड उपक्रमातून राज्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा : आमदार राजेश क्षीरसागर
|