बातम्या
टीओडी मीटरशी छेडछाड करताच महावितरणला मिळते माहिती
By nisha patil - 8/29/2025 10:20:52 PM
Share This News:
टीओडी मीटरशी छेडछाड करताच महावितरणला मिळते माहिती
सांगली जिल्ह्यातील १८ ग्राहकांवर कारवाई, १ लाख ७४ हजारांची वीज चोरी उघड
सांगली, दि. २९ ऑगस्ट : महावितरणच्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील १८ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी एकूण ७,७८७ युनिटची वीज चोरी केली असून दंडासह एकत्रित रक्कम १ लाख ७४ हजार ३३७ रुपये वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांवर भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
महावितरणचे कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सांगितले की, “टीओडी मीटरशी छेडछाड केली की त्याची माहिती महावितरणला तात्काळ मिळते. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.”
विभागनिहाय वीज चोरी
-
सांगली ग्रामीण विभाग – ९ ग्राहक, ३,५३१ युनिट (रु. ८०,५७६)
-
विटा विभाग – ३ ग्राहक, १,२४४ युनिट (रु. २६,५००)
-
इस्लामपूर विभाग – ३ ग्राहक, १,३६७ युनिट (रु. ८,२३०)
-
कवठेमहांकाळ विभाग – २ ग्राहक, १,६४५ युनिट (रु. ४६,०३१)
-
सांगली शहर विभाग – १ ग्राहक, ५९३ युनिट (रु. १३,०००)
छेडछाड कशी केली?
महावितरणच्या तपासणीत ग्राहकांनी मीटरचे कव्हर उघडून त्यात रेजिस्टन्स बसवून वीज चोरी केल्याचे समोर आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
टीओडी मीटरची वैशिष्ट्ये
टीओडी मीटर हे कम्युनिकेबल असून महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले आहेत. त्यामुळे मीटरमधील कोणतीही बिघाड किंवा छेडछाड तात्काळ महावितरणला समजते. प्रत्यक्ष तपासणीत हे प्रकार उघडकीस येत आहेत.
मुख्य अभियंता काटकर यांनी अधिकाऱ्यांना अशा ग्राहकांविरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या असून ग्राहकांनी टीओडी मीटरशी छेडछाड करू नये, अन्यथा फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे आवाहन केले आहे.
टीओडी मीटरशी छेडछाड करताच महावितरणला मिळते माहिती
|