बातम्या

सांघिक कामगिरीमुळे महावितरणला प्रथम क्रमांक

Mahavitaran ranks first due to team performance


By nisha patil - 9/21/2025 9:40:03 PM
Share This News:



सांघिक कामगिरीमुळे महावितरणला प्रथम क्रमांक

दर्जेदार ग्राहकसेवेसाठी आणखी तत्पर राहावे – संचालक राजेंद्र पवार

कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर २०२५ : केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवत महावितरणने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक व परिणामाभिमुख कार्यपद्धतीमुळे साध्य झाल्याचे महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी सांगितले.

येथील ‘विद्युत भवन’ येथे कोल्हापूर परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता गणपत लटपटे व पूनम रोकडे, कार्यकारी अभियंते संजय गवळी, म्हसू मिसाळ, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, अशोक जाधव, सुधाकर जाधव, सागर मारुळकर, निलेश चालिकवार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

संचालक पवार म्हणाले, “प्रथम क्रमांक ही अभिमानाची बाब आहे; मात्र त्यासोबत आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देणे हाच महावितरणचा खरा चेहरा आहे.”

ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून वीजग्राहकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून द्यावी. सेवा पर्व (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) दरम्यान या योजनेसाठी विशेष अभियान राबवले जात आहे.

महावितरणकडून नुकत्याच झालेल्या ५५०० विद्युत सहायकांच्या भरतीमुळे ग्राहकसेवेला बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. “ग्राहकांचे समाधान हेच महावितरणच्या सेवेचे खरे प्रमाणपत्र आहे,” असे  पवार यांनी नमूद केले.

तसेच, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून अभियंते व कर्मचाऱ्यांनी घरोघरी वीजसुरक्षेची जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी दिली.


सांघिक कामगिरीमुळे महावितरणला प्रथम क्रमांक
Total Views: 72