विशेष बातम्या

महावितरण पुनर्रचना ग्राहक व कर्मचारी हिताची

Mahavitaran restructuring is in the interest of customers and employees


By nisha patil - 10/25/2025 3:12:40 PM
Share This News:



महावितरण पुनर्रचना ग्राहक व कर्मचारी हिताची

ग्राहक सेवा व थकबाकी वसुलीला प्राधान्य द्या

कार्यकारी संचालक परेश भागवत यांची आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर, दि. २४ ऑक्टोबर २०२५: महावितरणमध्ये राबवण्यात येणारी पुनर्रचना ही वीज ग्राहक व कर्मचारी या दोघांच्या हिताची आहे. या पुनर्रचनेमुळे वीज ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा मिळणार असून वीज कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. राज्यातील शहरी भागात राबवण्यात येणाऱ्या पुनर्रचनेत आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्याची प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक पद्धतीने हा बदल स्वीकारावा असे आवाहन कार्यकरी संचालक (देयक व महसूल/मानव संसाधन) परेश भागवत यांनी केले आहे. 

    महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत ‘विद्युत भवन’ कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यालयातील अंतर्गत सुधारणा विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद दिग्रसकर, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगली मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक परेश भागवत म्हणाले, ‘अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सरसकट कामांचा ताण कमी करून निवडक कामांची जबाबदारी देण्याकरता व्यवस्थापनाने पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे. याबाबत वीज संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या पुनर्रचनेमुळे कर्मचाऱ्यांना सरसकट एकाच वेळी अनेक  प्रकारची कामे करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत (फोकस) पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामेच करावयाची आहेत.  यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. पर्यायाने वीजग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होणार आहे.’

परेश भागवत पुढे म्हणाले, ‘फिल्डवर काम करताना ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडवा. ग्राहकांना वीज सेवा देताना अंगी व्यावसाईक दृष्टीकोन बाळगा. उपलब्ध कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कौशल्यांचा सुयोग्य वापर करा. उच्चदाब ग्राहकांच्या तक्रारी शून्यावर आणा. ग्राहकांना वेळेत बिल द्या व थकबाकी वसूल करा. शासकीय कार्यालयातील व वाणिज्य ग्राहकांचे सर्व मीटर हे प्राधान्याने टीओडी स्मार्ट मीटरद्वारे बदला. वीज हानी कमी करा. माहिती तंत्रज्ञान विभागातून दिले जाणारे विविध अहवाल तपासा व त्यानुसार कार्यवाही करा. पुनरर्चनेत अधिकच्या कर्मचाऱ्यांची अद्यावत नोंद ठेवा. ग्राहक हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा, अशा सूचना कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी यावेळी दिल्या.

यावेळी कोल्हापूर परिमंडलात सुरु असणाऱ्या विविध योजना, कामे यांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख, उप विभागीय अधिकारी उपस्थित होते.


महावितरण पुनर्रचना ग्राहक व कर्मचारी हिताची
Total Views: 82