बातम्या
महावितरण घेणार सर्व जिल्हाभर ग्राहक मेळावे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
By Administrator - 8/8/2025 4:31:03 PM
Share This News:
महावितरण घेणार सर्व जिल्हाभर ग्राहक मेळावे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (दि.११) होणार मेळावा
कोल्हापूर, दि. ०६ ऑगस्ट २०२५ : महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारीचे निरसन वेळेत करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उपविभागीय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्याचे निर्देश मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले होते. त्यानुसार महावितरणने जुलै महिन्यात घेतलेल्या मेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील ६१२ ग्राहकांनी घेतला होता. यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले तसेच मेळाव्यांत ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना विविध योजनांची माहिती देणे शक्य होत असल्याने तसेच ग्राहकांशी सुसंवाद स्थापित होत असल्याने या ग्राहक मेळाव्याची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना केल्या. त्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहक मेळाव्याची व्याप्ती शाखा कार्यालयापर्यंत घेण्याचा निर्णय घेतला आहे . याची सुरुवात या महिन्याच्या दुसऱ्या सोमवार (दि.११ ऑगस्ट) पासून होणार आहे.
महावितरण महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी सकाळी १०.०० ते दुपरी ०१.३० पर्यंत शाखा कार्यालय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेणार आहे. तसेच सोमवारी शासकीय सुट्टी असेल तर पुढील दिवशी म्हणजेच मंगळवारी सदरचा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांनी सदरच्या ग्राहक मेळाव्या मध्ये सहभागी होऊन आपले तक्रार अर्ज सादर करणेबाबत आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन प्रात्यक्षिकांसह करण्यात येणार आहे. यावेळी ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर सुर्य घर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी उपयुक्त योजनांची माहितीही देण्यात येईल.
जुलै महिन्यात झालेल्या ग्राहक मेळाव्यामध्ये प्राप्त झालेल्या तक्रार अर्जापैकी ५१२ तक्रारींचा जाग्यावर निपटारा करण्यात आला. कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांचेही ग्राहकांच्या अडचणी तत्काळ सोडवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी लवकर सोडवण्याचे निर्देश शाखा कार्यालय पर्यंत दिले आहेत, असे कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी म्हटले आहे.
महावितरण घेणार सर्व जिल्हाभर ग्राहक मेळावे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
|