बातम्या
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेची कोल्हापूरात साधेपणाने सुरुवात
By nisha patil - 11/21/2026 10:17:34 PM
Share This News:
खेळातून संघभावनेचा विकास होतो – सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेची कोल्हापूरात साधेपणाने सुरुवात
राज्यातून ४०१ महिला व ८४५ पुरुष खेळाडू सहभागी
कोल्हापूर, दि. 21 नोव्हेंबर 2026 : ‘क्रीडास्पर्धा ही जय पराजय याच्या पलीकडे असून त्यातून शिस्त, जिद्द, नेतृत्व व संघभावना यांचा विकास होतो. या स्पर्धेतून कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामात व ग्राहकसेवेसाठी अधिक ऊर्जा मिळते. खेळाडूंनी विजयासाठी प्रयत्न करताना खिलाडूवृत्ती जपावी व स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे मत महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या पोलीस ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे कार्यकारी संचालक (महसूल व चाचणी) तथा पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक(प्रभारी) सुनिल काकडे होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे(भा.प्र.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा(भा.पो.से.), महावितरणचे कार्यकारी संचालक परेश भागवत, भुजंग खंदारे, मुख्य अभियंते ज्ञानेश कुलकर्णी, संजय पाटील, अशोक साळुंखे, दीपक पाटील, स्वप्नील काटकर, मुख्य महाव्यवस्थापक(विवले) अनिल कालेकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुनील काकडे म्हणाले, ‘महावितरणचे अधिकारी व कर्मचारी राज्यभर वीजसेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतात. आज तेच मैदानावर आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करत आहेत, ही आनंदाची बाब आहे.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यकारी संचालक परेश भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. ट्रॉफीचे अनावरण विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा(भा.पो.से) व छत्रपती संभाजीनगरचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे(भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले.
या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे १२४६ खेळाडूपैकी ४०१ महिला व ८४५ पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या क्रीडा स्पर्धेत १८ खेळ प्रकारातील सामने रंगणार असून येत्या मंगळवारी (दि.२४) समारोप होणार आहे. यावेळी खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले. आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी मानले.
आजच्या स्पर्धेंचे निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे) : -
१०० मीटर(महिला) - प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप), भारती राऊत (कल्याण-रत्नागिरी), संजना शेजाळ(पुणे-बारामती)
१०० मीटर(पुरुष) - गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), शुभम निंबाळकर (कोल्हापूर), चंद्रशेखर हेमने(नागपूर-गोंदिया-चंद्रपूर)
४०० मीटर(महिला) - रागिणी बेले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), भक्ती लोमटे(पुणे-बारामती), स्नेहल धावरे(कोल्हापूर)
४०० मीटर(पुरुष) - प्रतिक वाईकर (पुणे-बारामती), चंद्रशेखर हेमने(नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), अथर्व कोळी(कोल्हापूर)
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेची कोल्हापूरात साधेपणाने सुरुवात
|