बातम्या

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा म्हणजे संघभावनेचा संस्कार

Mahavitarans state level sports competitions


By nisha patil - 12/11/2025 5:03:21 PM
Share This News:



महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा म्हणजे संघभावनेचा संस्कार

संचालक  राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे अमरावतीमध्ये थाटात उद्घाटन

अमरावती, दि. १२ नोव्हेंबर २०२५: महावितरणने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अनेक महिला व पुरुष खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. कोणत्याही सांघिक खेळ प्रकारात खेळाडूंमधील परस्पर सहकार्य, समन्वय व विश्वास या त्रिसुत्रीशिवाय विजय शक्य होत नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रथम संघभावना निर्माण होणे आवश्यक आहे. महावितरणच्या दरवर्षी होणाऱ्या राज्य क्रीडा स्पर्धा या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी एकजुटीचा व संघभावनेचा संस्कार आहे असे प्रतिपादन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. १२) केले.

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून संचालक पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकणचे सहव्यस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, संजय पाटील, राजेश नाईक, अरविंद बुलबुले, संजीव भोळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  संजय ढोके, महाव्यवस्थापक  राजेंद्र पांडे तसेच प्राचार्य श्रीनिवास देशपांडे यांची उपस्थिती होती.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११७० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन सौ. क्षिप्रा मानकर,  विजय पांडे यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. मधुसूदन मराठे यांनी आभार मानले. या क्रीडा स्पर्धेत २२ खेळ प्रकारातील सामने रंगणार असून येत्या शनिवारी (दि. १५) समारोप होणार आहे.

१०० मीटर धावस्पर्धेत प्रिया पाटील, गुलाबसिंग वसावेंची बाजी – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांनी सुवर्णपदक तर साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी रौप्यपदक पटकावले. तर महिला गटात प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी सुवर्णपदक तर श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना संचालक  राजेंद्र पवार यांच्याहस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.


महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा म्हणजे संघभावनेचा संस्कार
Total Views: 101