बातम्या

महावितरणची इरिगेशनच्या उच्चदाब कृषी ग्राहकांकरिताची कार्यशाळा संपन्न

Mahavitarans workshop for high


By nisha patil - 11/28/2025 3:16:25 PM
Share This News:



महावितरणची इरिगेशनच्या उच्चदाब कृषी ग्राहकांकरिताची कार्यशाळा संपन्न

टिओडी स्मार्ट मीटर, केव्हीएएच बिलिंग बाबतच्या शंकांचे केले निरसन

कोल्हापूर,  : महावितरणकडून उच्चदाब कृषी ग्राहक यांना टिओडी स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. टिओडी स्मार्ट मीटरच्या बाबतीत या सर्व ग्राहकांच्या तसेच इरिगेशन फेडरेशन सभासदांच्या  शंकांचे निरसन करण्याकरता विशेष कार्यशाळेचे आयोजन महावितरणकडून करण्यात आले. याचा लाभ सुमारे २०० हून अधिक शेतकऱ्यांनी घेतला. सदरची कार्यशाळा महावितरणच्या ताराबाई पार्क येथील परिमंडल कार्यालयाच्या लघु प्रशिक्षण केंदात आयोजन करण्यात आले होते.

यावेळी इरिगेशन फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार संजय बाबा घाटगे, कार्याध्यक्ष रत्नाकर तांबे, जिल्हा अध्यक्ष विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील भुयेकर, महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंते दत्तात्रय भणगे, सुनील गवळी, म्हसू मिसाळ, अजित अस्वले व शेतकरी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत महावितरणचे चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांनी संगणकीय सादरीकरण केले. यावेळी टिओडी मीटर, केव्हीएएच बिलिंग, कपॅसिटर, यंत्रणा हाताळणी आदी विषयांवर माहिती दिली. यावेळी संघटनेच्या मागणीनुसार सहा ठिकाणी बसवण्यात आलेले जुने मीटर व टिओडी स्मार्ट मीटर यांच्या चाचणीचे आकडेवारीसह सादरीकण करण्यात आले. यावेळी उच्चदाब कृषी पाणीपुरवठा संस्था चालक, पदाधिकारी यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. 

केव्हीएएचनुसार बिलिंग करताना बिलावर नियंत्रण राहण्यासाठी कपॅसिटर बसवणे ग्राहकांच्या फायद्याचे आहे, जिल्ह्यात सहा ठिकाणी नवे व जुने मीटर बसवण्यात आले आहेत त्याचे रिडींग सारखेच आले आहेत. त्यात तांत्रिक दृष्ट्या कोणतीही त्रुटी नाही तसेच उच्चदाब ग्राहकाचे मीटर बदलताना महावितरणच्या मंडल कार्यालयाची टीम सोबत असते असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले. तर गुणवत्तापूर्ण व तांत्रिक दृष्ट्या सक्षम मीटरच बसवण्यात येत आहेत अशी माहिती अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिली.

फेडरेशनने मानले महावितरणचे आभार

इरिगेशन फेडरेशनच्या प्रतिनिधीना महावितरण कपॅसिटर, केव्हीएएच आदी बाबतीत माहिती व ट्रेनिंग देणार आहे. तसेच सर्व ग्राहकांना निमंत्रण देऊन चर्चेस बोलावले व संवादाची भूमिका ठेवली याकरता इरिगेशन फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार संजय बाबा घाटगे व कार्याध्यक्ष रत्नाकर तांबे यांनी महावितरणचे आभार मानले. 


महावितरणची इरिगेशनच्या उच्चदाब कृषी ग्राहकांकरिताची कार्यशाळा संपन्न
Total Views: 12