बातम्या

महावितरणच्या ऑनलाइन सेवेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahavitran 1


By nisha patil - 6/30/2026 10:59:20 PM
Share This News:



*महावितरणच्या ऑनलाइन सेवेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद*

*ऑनलाइन पद्धतीने ४,९६६ ग्राहकांनी बदलले नाव तर ६६४ जणांनी वाढविला वीजभार*

*कोल्हापूर, दि. ३० जून २०२६:* महावितरणच्या ऑनलाइन सेवांना कोल्हापूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात ४ हजार ९६६ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने नावात बदल केला आहे. तर ६६४ ग्राहकांनी वीज भार बदल केला आहे. वीज ग्राहकांनी अधिकाधिक ऑनलाईन सेवांचा वापर करत त्यांच्या श्रम व वेळेची बचत करावी असे आवाहन कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.

महावितरणने 'ईज ऑफ लिव्हिंग' उपक्रमांतर्गत ग्राहकांना मोबाईल अॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिली आहे. मालमत्तेची खरेदी-विक्री, वारसा हक्क अथवा इतर कारणांमुळे वीजजोडणीवरील नाव बदल तसेच वाढीव वीजभाराची आवश्यकता असल्यास ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील विभागनिहाय आकडेवारीनुसार नाव बदलासाठी कोल्हापूर शहर विभागात ९८९, कोल्हापूर ग्रामीण विभाग-१ मध्ये १०५६, कोल्हापूर ग्रामीण विभाग-२ विभागात ८३८, गडहिंग्लज विभागात ८१४, इचलकरंजी विभागात ६६२, तर जयसिंगपूर विभागात ६०७ वीज ग्राहकांनी ऑनलाईन अर्ज सादर करत या सेवेचा लाभ घेतला आहे. 

 

वीजभार वाढीच्या ऑनलाइन सेवेलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर शहर विभागात १३९, जयसिंगपूर विभागात १३२, इचलकरंजी विभागात १३३, कोल्हापूर ग्रामीण विभाग-२ विभागात ११७, कोल्हापूर ग्रामीण विभाग-१ विभागात ८१, तर गडहिंग्लज विभागात ६२ वीज ग्राहकांनी ऑनलाईन सेवाचा लाभ घेतला आहे.   

 

महावितरणच्या या ऑनलाईन सुविधेमुळे अर्ज प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख झाली आहे. वीज ग्राहकाने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरल्यानंतर नाव बदलाची प्रक्रिया तसेच नवीन मीटर किंवा अतिरिक्त यंत्रणा आवश्यक नसल्यास वाढीव वीजभार अवघ्या तीन दिवसांत मंजूर केले जात आहे. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांनाही या सेवांचा मोठा लाभ होत आहे. वीज ग्राहकांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपच्या माध्यमातून विविध सेवांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.


महावितरणच्या ऑनलाइन सेवेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 15