बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीत महायुतीचा दबदबा..
By nisha patil - 12/21/2025 4:49:42 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीत महायुतीचा दबदबा..
महाविकास आघाडीला मोठा धक्का; फक्त शिरोळ आणि पेठ वडगावमध्येच खाते खुले
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवत जिल्ह्यावर आपला स्पष्ट राजकीय ठसा उमटवला आहे. झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये सहभागी असलेल्या तब्बल ८ पॅनलनी ११ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला मोठ्या पिछेहाटीचा सामना करावा लागला आहे.
जिल्ह्यातील पन्हाळा, हुपरी, कागल, मुरगुड, आजरा, मलकापूर, चंदगड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ आणि पेठ वडगाव या १३ नगरपालिकांसाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीने १३ पैकी ११ नगराध्यक्षपदे जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
महायुतीकडून निवडून आलेले नगराध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत –
पन्हाळा येथून जयश्री प्रकाश पोवार (जनसुराज्य शक्ती), हुपरीत मंगलराव माळगे (भाजप), कागलमध्ये सविता माने (राष्ट्रवादी काँग्रेस), मुरगुडमध्ये सुहासिनी देवी पाटील (शिवसेना), आजऱ्यात अशोक चराटी (ताराराणी आघाडी-भाजप), मलकापूरमध्ये रश्मी कोटावळे (जनसुराज्य शक्ती), चंदगडमध्ये सुनील काणेकर (भाजप), गडहिंग्लजमध्ये महेश तुरंबतमट (राष्ट्रवादी काँग्रेस), कुरुंदवाडमध्ये मनीषा डांगे (यड्रावकर राजर्षी शाहू आघाडी), हातकणंगले येथे अजित पाटील (शिवसेना) तर जयसिंगपूरमध्ये संजय यड्रावकर (राजश्री शाहू आघाडी) यांनी विजय मिळवला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीला केवळ शिरोळ येथे योगिता कांबळे (शिवशाहू आघाडी) आणि पेठ वडगाव येथे विद्याताई पोळ (यादव आघाडी) या दोनच नगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे.
या निकालांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही या निकालांचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीत महायुतीचा दबदबा..
|