बातम्या
महायुती सरकार जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी – संजय गवस
By Administrator - 8/7/2026 6:35:20 AM
Share This News:
महायुती सरकार जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी – संजय गवस
दोडामार्ग - शुभम गवस : राज्यातील महायुती सरकार व प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले असून, विविध प्रश्नांमुळे जनतेमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास जनताच रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गवस यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्या तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनीकडून ही समस्या प्रभावीपणे सोडविण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाचे या विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.
वीज सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आली. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. निकृष्ट दर्जाची उपकरणे वापरण्यात आल्याने वीज यंत्रणेवर त्याचा विपरीत परिणाम होत असून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी तिन्ही तालुक्यांतील नागरिक, व्यापारी व उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सततच्या वीज खंडितमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिले आणि महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचे गवस यांनी नमूद केले.
वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू असल्याने शासनाच्या धोरणांबाबत शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. वीज क्षेत्रातील खासगीकरणाच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त करताना, भविष्यात सर्वसामान्य जनतेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.
लोकशाही टिकवायची असेल तर जनतेने आपल्या प्रश्नांवर आवाज उठवणे आवश्यक आहे. अन्यथा अशा समस्यांना नागरिकांना आयुष्यभर सामोरे जावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनतेच्या पाठीशी कायम उभी राहील, असे संजय गवस यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकार जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी – संजय गवस
|