राजकीय

प्रभाग क्रमांक ६ मध्ये महायुतीची प्रचार सभा उत्साहात संपन्न

Mahayutis campaign meeting in Ward No 6 concluded with enthusiasm


By nisha patil - 6/1/2026 12:40:40 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ६ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार पेठेतील पंचगंगा हॉस्पिटलजवळ सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वेळी बोलताना आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी आपल्या २००९ सालच्या पहिल्या निवडणुकीची आठवण करून देत, त्या वेळी या भागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आजही कायम असल्याची भावना व्यक्त केली. सुरुवातीला १५०० मतांच्या पिछाडीवर असतानाही नागरिकांनी साथ देत २५०० मतांचे मताधिक्य मिळवून दिले. तेव्हापासून आजपर्यंत नागरिकांनी आपल्या राजकीय वाटचालीत सातत्याने भक्कम पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

या परिसराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पूर समस्येच्या कायमस्वरूपी समाधानासाठी जागतिक बँक, राज्य शासन व मित्रा संस्था यांच्या सहकार्याने पूर नियंत्रण प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुराच्या समस्येतून कायमचा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असून, शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे विकासकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी महानगरपालिकेत महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

या प्रचार सभेस खासदार श्री. धनंजय महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, महायुतीच्या उमेदवार सौ. शिला सोनुले, सौ. माधवी गवंडी, सौ. दिपा काटकर, श्री. नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक श्री. प्रकाश गवंडी, महानगराध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, अल्पसंख्यांक सेना जिल्हा संपर्कप्रमुख श्री. रियाज बागवान, माजी नगरसेवक श्री. उदय जगताप यांच्यासह श्री. विराज चिखलीकर, श्री. निरंजन खाडे, श्री. जयराज ओतारी, श्री. नाना आयरेकर, श्री. सुरेश सुतार, श्री. सचिन क्षीरसागर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


प्रभाग क्रमांक ६ मध्ये महायुतीची प्रचार सभा उत्साहात संपन्न
Total Views: 31