खेळ
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांची मान्यता
By nisha patil - 12/20/2025 1:21:06 PM
Share This News:
कोल्हापूर :- कोल्हापूर शहरासाठी क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद ठरणारी बातमी असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी सामने आयोजित करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी (FIH) यांची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
ऑस्ट्रेलियास्थित फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीच्या मानकांनुसार आवश्यक असलेले पॉलिटॅन कंपनीच्या असोसिएशनच्या निकषांप्रमाणे अत्याधुनिक अॅस्ट्रोटर्फ मैदान महापालिकेच्या वतीने या स्टेडियममध्ये बसविण्यात आले आहे.
१५ नोव्हेंबर रोजी तपासणी
अॅस्ट्रोटर्फ मैदानाची १५ नोव्हेंबर रोजी FIH कडून प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर सर्व निकषांची पूर्तता झाल्याने मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या स्टेडियमवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी सामने आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘खेलो इंडिया’ अंतर्गत प्रकल्प
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे अॅस्ट्रोटर्फ मैदान व पूरक सुविधा विकसित करण्यासाठी ५.५० कोटी रुपयांच्या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी मिळाली होती.
प्रशासकांचा मोलाचा पाठपुरावा
या प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
या मान्यतेमुळे कोल्हापूरचा क्रीडा नकाशावर ठसा अधिक ठळक होणार असून, स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचा अनुभव मिळणार आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांची मान्यता
|