कोल्हापूर:- राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाच्या सीमा तपासणी नाका, शिनोळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील पथकाने गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला बनावट विदेशी मद्यसाठा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत 5 लाख 88 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त केला आहे.
मा. डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य), मा. श्री. प्रसाद सुर्वे (सह आयुक्त – अंमलबजावणी व दक्षता), मा. विभागीय उप-आयुक्त श्री. विजय चिंचाळकर, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व उप-अधीक्षक श्री. युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार उत्पादन शुल्क पथकाने पारगड–हेरे रोडवर, हेरे गावाच्या हद्दीत (ता. चंदगड) सापळा रचला. यावेळी पारगडकडून हेरेकडे भरधाव वेगात येणारी काळ्या काचा असलेली होंडा सिटी (MH-09-DA-8795) ही चारचाकी कार संशयास्पदरीत्या अडवण्यात आली.
वाहनाची सखोल तपासणी केली असता डिक्कीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या 396 सिलबंद बाटल्या (15 बॉक्स) आढळून आल्या. सदर मद्य फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सुखदेव बाळासो कट्टीकर (वय 24, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) व
प्रमोद संभाजी हंडीफोड (वय 26, रा. लक्ष्मी नगर, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली)
या दोन आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक श्री. संदीप जाधव, दुय्यम निरीक्षक श्री. हरिभाऊ लांडे तसेच जवान श्री. राहुल शिंदे, किरण बागुल, तुषार पवार व हर्षवर्धन भोसले यांचा सहभाग होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. संदीप जाधव हे करीत आहेत.