बातम्या
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! आता आधार OTP वर मिळणार NCMC कार्ड
By nisha patil - 9/21/2026 4:42:04 PM
Share This News:
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! आता आधार OTP वर मिळणार NCMC कार्ड
एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता आधारच्या OTP द्वारेही NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणात येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन महामंडळाने विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आज, २१ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे. एसटी प्रवासात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळते. या सवलतीच्या प्रवाशांसाठी NCMC कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र, बायोमेट्रिक करताना बोटांचे ठसे जुळत नसल्याने अनेक प्रवाशांची कार्ड नोंदणी रखडली होती. आता आधारला जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या OTPच्या माध्यमातून नोंदणी पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, १९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या प्रवाशांना २५ सप्टेंबरपासून NCMC कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
कार्ड मिळेपर्यंत प्रवाशांना QR कोड असलेली नोंदणी पावती दिली जाईल. कार्ड मिळाले नाही तरी ही पावती दाखवून सवलतीच्या दरात तिकीट घेता येणार आहे. ही पावती ३० दिवस वैध राहणार आहे. म्हणजेच, बायोमेट्रिकची अडचण टळणार आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता OTPचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! आता आधार OTP वर मिळणार NCMC कार्ड
|