बातम्या
कारागिरांची दिवाळी केली गोड! श्री रवळनाथ देवस्थान उपकमिटीचा माणुसकीचा आदर्श!
By nisha patil - 4/11/2026 3:12:08 PM
Share This News:
कारागिरांची दिवाळी केली गोड! श्री रवळनाथ देवस्थान उपकमिटीचा माणुसकीचा आदर्श!
प्रतिनिधी हसन तकीलदार मंदिराच्या उभारणीत घाम गाळणाऱ्या हातांचाही सण आनंदात साजरा व्हावा, या भावनेतून आजरा येथील श्री रवळनाथ मंदिर देवस्थान उपकमिटीने माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार आणि बांधकामासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कारागिरांना दिवाळीनिमित्त फराळ आणि अभ्यंगस्नानाच्या साहित्याची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. श्री रवळनाथ मंदिराचे नूतनीकरण आणि बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. या कामासाठी परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ३० कारागीर कार्यरत आहेत. सणासुदीच्या काळात घरापासून दूर राहून मंदिराच्या सेवेत योगदान देणाऱ्या या कामगारांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने उपकमिटीने हा उपक्रम राबवला.
यावेळी प्रत्येक कामगाराला दिवाळी फराळाचे पाकीट, उटणे, तेल आणि अभ्यंगस्नानाचे साहित्य देण्यात आले. मुख्य ठेकेदार म्हणून आचल मुल्लाणी काम पाहत असून, सूरज पाथरवट सुपरवायझर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळी भावना व्यक्त करताना सूरज पाथरवट यांनी सांगितले की, कामगारांच्या मेहनतीची दखल घेत माणुसकीच्या नात्याने दिलेल्या शुभेच्छा आणि भेटी खरोखरच अनमोल आहेत. ही आमच्या कामाची पोचपावतीच आहे.
या कार्यक्रमाला उपकमिटीचे अध्यक्ष आनंदराव कुंभार, उपाध्यक्ष सुजीत देसाई, खजिनदार मल्लिकार्जुन तेरणी, डॉ. दीपक सातोसकर, दीपक कुरूणकर, सुभाष नेवगी यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कारागिरांची दिवाळी केली गोड! श्री रवळनाथ देवस्थान उपकमिटीचा माणुसकीचा आदर्श!
|