बातम्या

संयुक्त वाघाची तालीम मंडळाचा उपक्रम; मलिग्रेत साडेतीन लाखांच्या वॉटर एटीएमची सुरुवात

Maligre Gets Modern Water ATM Through Community Initiative


By nisha patil - 2/6/2026 3:43:01 PM
Share This News:



आजरा तालुक्यातील मलिग्रे येथे संयुक्त वाघाची तालीम मंडळाच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएमचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. एअरटेक प्रा. लि. कंपनीचे उद्योजक साईनाथ नेसरीकर यांच्या आर्थिक सहकार्याने सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

या वॉटर एटीएममुळे ग्रामस्थांना फिल्टर केलेले थंडगार तसेच साधे आर.ओ. पाणी उपलब्ध होणार आहे. उद्घाटन नाना नेसरीकर आणि सुशिला नेसरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.

प्रास्ताविक करताना कॉ. संजय घाटगे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सरपंच शारदा गुरव यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वॉटर एटीएमसाठी बोअरवेलची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. शुद्ध पाण्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना चांगली सुविधा मिळाल्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांनी गावाच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष राऊ बुगडे यांनी किशोर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनाचे कौतुक करताना यापूर्वीही गावात सौर दिवे आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.

यावेळी माजी सरपंच अशोक शिंदे यांनी उद्योजक साईनाथ नेसरीकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला विविध मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संयुक्त तालीम मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी केले.


मलिग्रे गावात वॉटर एटीएमचे उद्घाटन; ग्रामस्थांना शुद्ध आर.ओ. पाणी उपलब्ध
Total Views: 246