राजकीय
शिरढोण पं.स.मतदार संघात मनिषा कदम विजयी
By nisha patil - 10/2/2026 2:00:37 PM
Share This News:
शिरढोण पं.स.मतदार संघात मनिषा कदम विजयी

शिरढोण ता.शिरोळ(संजय गायकवाड) :- पंचायत समिती मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली होती. या प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या सौ मनीषा रणजीत कदम या विजय झाल्या.त्या विजयी झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
शिरढोण पंचायत समिती मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. अत्यंत अटीतटीची लढत होऊन चुरशीने मतदान झाले होते. या मतदार संघात काँग्रेसकडून सौ. सायली विवेक मालगावे, भाजपाकडून सौ. तेजस्विनी गितन यादव तर राजश्री शाहू विकास आघाडी कडून सौ.मनीषा रणजित कदम हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले होते. मनिषा कदम या स्वर्गीय दत्ताजीराव कदम यांच्या घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीत भाग घेतली होती. कदम घरातील व्यक्ती निवडणूकीस उभे राहिल्याने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरढोण पंचायत समितीची जागा बिनविरोध निवड करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे निरोप देऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. शेवटी निवडणूक झाली. या मतदार संघात शिरढोण,शिरदवाड व शिवनाकवाडी या गावांचा समावेश होता.यामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या मनीषा कदम यांना ५२२३ मते, काँग्रेसच्या सायली मालगावे यांना ३५५८ मते,तर भाजपाच्या तेजस्विनी यादव यांना २५७२ मते मिळाली.
यामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या मनीषा कदम या १६६५ मतांनी विजयी झाल्या.मनिषा रणजित कदम या स्वर्गीय दत्ताजीराव कदम यांच्या नातसून तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची बहीण आहे.
या झालेल्या निवडणुकीत प्रचार सभा, रॅली, गाठी भेटी तसेच आरोप प्रत्यारोप झाले होते. निवडणूक अत्यंत चुरशीने झाल्याने मतदारांना मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालाचे अंदाज बांधले जात होते मात्र कुणालाही निकालाचा अंदाज सांगता आला नाही मात्र सुज्ञ मतदारांनी दान रूपाने मत सौ. मनीषा कदम यांच्या परड्यात टाकल्याने त्या विजयी झाल्या.
शिरढोण पं.स.मतदार संघात मनिषा कदम विजयी
|