राजकीय
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट उघडकीस — अडीच कोटींची सुपारी, संशयितांच्या चौकशीत ‘बड्या’ नेत्याचं नाव!
By nisha patil - 8/11/2025 12:39:06 PM
Share This News:
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कटासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्या चौकशीत एका बड्या राजकीय नेत्याचं नाव समोर आल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मात्र, हा नेता नेमका कोण, याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला. बीड शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गुप्त बैठकीत या कटाचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्या बैठकीत काही स्थानिक ओळखीच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्याच व्यक्तींनी जरांगे पाटलांपर्यंत ही माहिती पोहोचवली.
या प्रकरणानंतर पोलिसांनी जरांगे पाटलांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन तातडीने तपासात गती आणण्याची मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “माझ्या जीवावर काटेकोरपणे कट रचला गेला आहे. पण मी मराठा समाजासाठी शांततेचं आवाहन करतो.”
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. सुपारीची रक्कम ठरवताना काही स्थानिक व्यापारी आणि राजकीय मंडळींचा सहभाग असल्याची चर्चा आहे. पोलिस आता सर्व कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत.
या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, या कटामागे नेमका कोण नेता आहे, हे स्पष्ट होण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणाचं संपूर्ण चित्र समोर येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट उघडकीस — अडीच कोटींची सुपारी, संशयितांच्या चौकशीत ‘बड्या’ नेत्याचं नाव!
|