बातम्या
कोल्हापुरात गांजाची तस्करी उघड; २३ वर्षीय तरुण जाळ्यात!
By nisha patil - 11/17/2026 3:35:56 PM
Share This News:
कोल्हापुरात गांजाची तस्करी उघड; २३ वर्षीय तरुण जाळ्यात!
कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत तब्बल १ किलो २०० ग्रॅम गांजासह दुचाकी असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत शेंडा पार्क ते आर. के. नगर मार्गावरील चेतना विकास संस्थेजवळ असलेल्या कुष्ठरोगी पडीक इमारती परिसरात गांजा विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी काळ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या राधेय अनिल पाथरुट या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या मोपेडची तपासणी केली असता डिकीमध्ये १ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत २४ हजार रुपये असून, ९० हजार रुपये किमतीची मोपेडही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी राधेय पाथरुट याच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कोल्हापुरात गांजाची तस्करी उघड; २३ वर्षीय तरुण जाळ्यात!
|