विशेष बातम्या
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या!” – अकोल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
By nisha patil - 11/13/2025 12:03:38 PM
Share This News:
अकोला 9 नोव्हेंबर 2025 – ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांच्या वेदनेला शब्द देणारी एक भावनिक घटना अकोल्यात घडली आहे. “माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या” अशी थेट विनंती एका ३४ वर्षीय तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केली आहे. शनिवारी (८ नोव्हेंबर) अकोल्यात झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात या तरुणाने पवारांना दिलेल्या निवेदनात आपली व्यथा मांडली. “माझं वय वाढत चाललं आहे.
भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. कृपया माझ्या आयुष्याचा विचार करून मला पत्नी मिळवून द्या. कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला आणि संसार नीट चालवायला मी तयार आहे. मला जीवनदान द्या, तुमचे उपकार मी विसरणार नाही,” असे त्या पत्रात म्हटले आहे.
हे निवेदन पाहून उपस्थित नेते अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांनाही क्षणभर स्तब्ध व्हावं लागलं. हे पत्र दुसऱ्या दिवशी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चेचा विषय ठरलं. अकोल्यातील या घटनेमुळे ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं आहे. गेल्या काही दशकांत ग्रामीण समाजरचनेत मोठे बदल झाले आहेत. मुलींचं प्रमाण घटलं आहे, शिक्षण आणि नोकरीच्या संधी शहरांकडे वळल्या आहेत आणि जोडिदाराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे बेरोजगार किंवा शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण अविवाहित राहत आहेत.
या घटनेमुळे सोलापूरमध्ये डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या “नवरदेव मोर्चा”ची आठवण पुन्हा झाली आहे. त्या वेळी सुमारे २५ तरुण फेटा, मुंडावळ्या आणि वाजंत्रीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते – नवरी मिळावी, अशी मागणी घेऊन! या दोन घटनांनी ग्रामीण समाजात निर्माण झालेली नव्या प्रकारची सामाजिक असमानता स्पष्ट केली आहे.
अकोल्यातील तरुणाचं पत्र हे केवळ एका व्यक्तीची वेदना नाही, तर ग्रामीण समाजातील बदलत्या वास्तवाचं आरसेदार प्रतिबिंब आहे. अपुरी शिक्षणसंस्था, बेरोजगारी, आर्थिक विषमता आणि लिंग गुणोत्तरातील असमतोल – या सगळ्यांनी एक नवी सामाजिक समस्या उभी केली आहे. या पत्रातून अजूनही सामान्य माणूस शरद पवारांसारख्या नेत्यांकडे आशेने पाहतो, हे स्पष्ट होतं.
अकोल्यातील हा “विनंती अर्ज” हा केवळ हास्यास्पद नसून हृदय पिळवटून टाकणारा आहे. एकटेपणाने त्रस्त ग्रामीण युवकाची तीव्र सामाजिक हाक यातून उमटते. ही घटना समाजाने आणि शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण हा केवळ एका तरुणाचा प्रश्न नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या वास्तवाचं जिवंत चित्र आहे.
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या!” – अकोल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
|