बातम्या

मसोली जवळ भिषण अपघातात चार जण जखमी

Masoli


By nisha patil - 2/6/2026 9:36:04 AM
Share This News:



**मसोली जवळ भिषण अपघातात चार जण जखमी*

**आजरा(हसन तकीलदार)*:- आजरा तालुक्यातील हाळोली गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.गोव्याकडून हैदराबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने आजराकडे जाणाऱ्या एस.टी. ची वाट पाहत उभ्या असलेल्या चौघांना तसेच एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात संजय काळू कांबळे (वय ४५), उषा संजय कांबळे (वय ४०), श्रुतिका संजय कांबळे (वय १४, सर्व रा. सोहाळे, ता. आजरा) आणि मालुबाई अशोक कांबळे (वय ३५, रा. महागोंड, ता. आजरा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण हाळोली गावातील यात्रेनिमित्त पाहुण्यांकडे रविवारी आले होते. यात्रा आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी सुमारे 8:00वाजण्याच्या सुमारास आपल्या गावी परत जाण्यासाठी मसोली बस स्टॉपवर थांबले होते. त्याचवेळी गोव्याकडून हैदराबादकडे जाणाऱ्या एमएच 14 एचडी 2761 क्रमांकाच्या भरधाव हुंडाई क्रेटा चारचाकी वाहनाने नियंत्रण गमावून बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या नागरिकांना व एमएच 09 एफझेड 0776 क्रमांकाच्या मोटरसायकलला धडक दिली.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाचा चालक भरतराज सुब्रमण्यम (रा. हैदराबाद) याला जखमी संजय काळू कांबळे रा. सोहाळे यांच्या फिर्यादीनुसार पो. हे. कॉ. कांबळे यांनी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पो. हे. कॉ. शिकलगार हे पुढील तपास करीत आहेत.


मसोली जवळ भिषण अपघातात चार जण जखमी
Total Views: 129