बातम्या
अंबप फाटा येथे चारचाकीला भीषण आग – सुदैवाने जीवितहानी नाही
By nisha patil - 10/17/2025 6:07:33 PM
Share This News:
अंबप फाटा येथे चारचाकीला भीषण आग – सुदैवाने जीवितहानी नाही
अंबप फाटा येथे गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.ही घटना लाडेगाव, तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट वाहनासोबत घडली. ते आपल्या साडू व मेहुणीसह कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते.
खरेदी करून घरी परत येत असताना अंबप फाटा येथे त्यांच्या वाहनाला अचानक आग लागली. ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही क्षणांतच गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले. घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
दरम्यान, वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ड्रायव्हर गणेश नायकवडी, फायरमन वैभव शिंदे, रोहन पोवार व अंकुश कदम यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही.या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे.
अंबप फाटा येथे चारचाकीला भीषण आग – सुदैवाने जीवितहानी नाही
|