बातम्या

कामगार आयुक्त कार्यालयावर 16 एप्रिलला भव्य आक्रोश मोर्चा; भारतीय मजदूर संघाची घोषणा

Massive protest march on April 16 at the Labour Commissioner office


By nisha patil - 4/3/2026 12:04:30 PM
Share This News:



कामगार आयुक्त कार्यालयावर 16 एप्रिलला भव्य आक्रोश मोर्चा; भारतीय मजदूर संघाची घोषणा

वीज कंत्राटी कामगारांच्या कायमस्वरूपी सेवेसाठी ‘हरियाणा पॅटर्न’ राबवण्याची मागणी; पुण्यात 6 वे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

 

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 6 वे त्रैवार्षिक अधिवेशन रविवारी (दि. 1 मार्च 2026) महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनात राज्यभरातील सुमारे 2300 वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते.

अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष एस. मल्लेशम यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्षा खासदार मेधा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना एस. मल्लेशम यांनी देशातील कामगार सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या चार कामगार संहितांपैकी वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोडचे स्वागत करत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच देशभर समान ‘मिनिमम फ्लोअर वेज’ जाहीर करावेत, पेन्शन फंडात वाढ करावी आणि ईएसआयसी पात्रता मर्यादा 21 हजारांवरून 42 हजार रुपये करावी, अशी मागणी त्यांनी केली.

खासदार मेधा कुलकर्णी यांनी कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या न्यायालयीन निर्णयाचे स्वागत करून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांनी न्यायालयीन निर्णयाचा अभ्यास करून कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी सकारात्मक भूमिका मांडली. तसेच वीज कंपनीची प्रतिमा उंचावणे, ग्राहक सेवा व सुरक्षा याबाबत कटिबद्ध राहण्याची शपथ कामगारांना देण्यात आली.

दरम्यान, प्रलंबित मागण्यांसाठी आणि ‘हरियाणा पॅटर्न’प्रमाणे कंत्राटदार-मुक्त रोजगार धोरण लागू करण्याच्या मागणीसाठी 16 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय (बांद्रा) येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे यांनी केली.

अधिवेशनात मंजूर प्रमुख ठराव :

  1. हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटदार-मुक्त रोजगार धोरण राबवावे.

  2. सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे.

  3. वीज उद्योगासाठी स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी.

  4. किमान वेतनाऐवजी ‘जीवन वेतन’ लागू करावे.

  5. ईएसआयसी पात्रता मर्यादा 21 हजारांवरून 42 हजार रुपये करावी.

अधिवेशनात 2006 ते 2029 या कालावधीसाठी निलेश खरात यांची अध्यक्षपदी तर सचिन मेंगाळे यांची सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली. राहुल बोडके (कार्याध्यक्ष), उमेश आणेराव (संघटन मंत्री), सागर पवार (कोषाध्यक्ष), अमर लोहार (उपमहामंत्री – कोल्हापूर) व अभिजीत माहुरकर (नागपूर) यांच्यासह राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अधिवेशनाचा समारोप सी. व्ही. राजेश यांनी केला. आयोजनासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष निखील टेकवडे, सचिव योगेश महांगरे व सुमीत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दहा समित्या कार्यरत होत्या. पुण्यातील 252 कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला.


कामगार आयुक्त कार्यालयावर 16 एप्रिलला भव्य आक्रोश मोर्चा; भारतीय मजदूर संघाची घोषणा
Total Views: 12