शैक्षणिक

मुख्याध्यापक संघातील कार्यशाळेत अधिकाऱ्यांचे बेरजेचे "गणित"

Mathematics of the sum of officers at the workshop


By nisha patil - 9/10/2025 11:59:38 AM
Share This News:



कोल्हापूर  : गणित विषयाची रुची वाढवण्यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवावेत यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून गणित शिक्षकांची मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनातील सभागृहात कार्यशाळा घेवून गणित आणि विज्ञान विषय शिक्षकांद्वारे विविध उपक्रमांची आखणी केली त्याचबरोबर शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती ऑनलाईन कशी भरावी याचे मार्गदर्शन करून बेरजेचे "गणित" साधले . 
     कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी विविध तालुक्यात या कार्यशाळेचे माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. परख सर्वेक्षण  २०२४ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान विषयाची संपादणूक पन्नास टक्क्याहून कमी असल्याचे अहवालात नमूद असल्याने शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे त्यातूनच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले .

त्यातूनच कृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी गणित शिक्षकांच्या कार्यशाळेत त्याचे नियोजन करण्यात आले . यासाठी प्रविण आंबोळे आणि श्रीशैल मठपती या तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना पाचारण करण्यात आले होते .
       प्रविण आंबोळे यांनी गणित विषयाची रुची वाढवण्यासाठीचे उपाय विषद करण्याबरोबरच NAS परीक्षेसंदर्भातील गणित आणि विज्ञान विषयक जाणिव जागृतता वाढवण्यासाठी शिक्षकांच्या भूमिकेसंदर्भात मार्गदर्शन केले . श्रीशैल मठपती यांनी जीवनानुभवासाठी विज्ञानाचे महत्व अधोरेखित करतानाच प्रायोगिक उपक्रमातून अध्ययन प्रक्रिया सुलभ केल्यास विज्ञानविषयक रुचीमध्ये वाढ होईल यासाठी शिक्षकांनी पाठाच्या अनुषंगाने विचार प्रवर्तक प्रश्नांची निर्मिती करण्याचे आवाहन केले .

उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी प्रास्ताविक करतानाच परख सर्वेक्षणचे निकष स्पष्ट केले तसेच  विद्यार्थी सुरक्षा, विकसीत भारत बिल्डथॉन, हरित विद्यालय रँकिंग ची माहिती व व्हिडीओ अपलोड करणे आदी शासनाच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि माहिती ऑनलाईन भरण्याविषयी मार्गदर्शन केले . शिक्षण उपनिरिक्षक बिराजदार यांनी गणित आणि विज्ञान शिक्षकांनी तंत्रस्नेही होण्या बरोबरच अध्यापनात मल्टीमिडियाचा वापर केल्यास त्याची परिणामकारकता अधिक चांगली होते असे सांगितले . प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनीही शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . यावेळी सुभाष बेलवळेकर, सागर वातकर यांच्यासह शहरातील बहुसंख्य शाळांतील गणित शिक्षक उपस्थित होते .


मुख्याध्यापक संघातील कार्यशाळेत अधिकाऱ्यांचे बेरजेचे "गणित"
Total Views: 46