बातम्या

लग्नानंतर वधू पळून गेल्याने मध्यस्थ दाम्पत्याला मारहाण

Mediator couple beaten up after bride runs away after wedding


By nisha patil - 11/27/2026 8:39:15 PM
Share This News:



लग्नानंतर वधू पळून गेल्याने मध्यस्थ दाम्पत्याला मारहाण

जैन्याळमधील प्रकार : चार लाखांची मागणी; पाच जणांवर गुन्हा

कागल प्रतिनिधी अजित बोडके लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत वधू पतीच्या घरातून पळून गेल्याने लमात मध्यस्थी केलेल्या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. जैन्याळ (ता. कागल) येथे हा प्रकार घडला. दाम्पत्याच्या घरात घुसून चार लाख रुपयांची मागणी केली तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मोहन लाड, सौरभ लाड, दत्ता पाटील, बाळू पाटील आणि श्री. भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

जैन्याळ येथील दाम्पत्याने लिंगनूर येथील एका तरुणाच्या विवाहासाठी मुलगी पाहून लग्न लावून देण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र, विवाहानंतर काही दिवसांतच ती मुलगी १८ नोव्हेंबर रोजी पळून गेली. घटनेनंतर २१ नोव्हेंबर रोजी रात्री संशयित जैन्याळ येथील मध्यस्थ कुटुंबाच्या घरी पोहोचले. 'मुलगी पळून गेल्यामुळे लग्नासाठी झालेला चार लाख रुपयांचा खर्च परत द्या, अन्यथा घर नावावर करून द्या,' अशी मागणी केली. यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित मोहन बाळासो लाड व सौरभ बाळासो लाड (दोघे रा. लिंगनूर, ता. कागल) यांनी फिर्यादी महिलेच्या पतीला

बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेशी दत्ता पाटील (रा. हादनाळ) याने विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच भोसले याने 'पैसे कसे वसूल करायचे हे आम्हाला माहीत आहे,' अशी धमकी देत महिलेशी अश्लील वर्तन केल्याचे नमूद आहे.

दरम्यान, वाद मिटविण्यासाठी आलेल्या महिलेच्या सावत्र मुलालाही संशयितांनी मारहाण केली, तर बाळू पाटील (रा. हादनाळ) याने महिलेच्या पतीला शिवीगाळ व मारहाण करून पुन्हा मारण्याची धमकी दिली. सहायक फौजदार जरग अधिक तपास करत आहेत.

 


लग्नानंतर वधू पळून गेल्याने मध्यस्थ दाम्पत्याला मारहाण
Total Views: 12