विशेष बातम्या
वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करा, ग्राहकांना अधिक चांगली सेवा द्या
By nisha patil - 11/20/2025 3:39:29 PM
Share This News:
वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करा, ग्राहकांना अधिक चांगली सेवा द्या
पुनर्रचनेमुळे कर्मचाऱ्यांचे वर्क लाईफ बॅलन्स होणार
महावितरणचे संचालक (संचालन / प्रकल्प) सचिन तालेवार
कोल्हापूर/ सांगली दि.१८ नोव्हेंबर २०२५ : ‘महावितरणचा सर्व डोलारा ग्राहकांनी वीज बिलापोटी भरणाऱ्या देयकावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्राहकाने वापरलेल्या प्रत्येक युनिटच्या वीज बिलाची वसुली करा. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा देण्याच्या दृष्टीने वीज यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती व एनर्जी ऑडिट करा. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजनांच्या अनुदानाकरिता थकबाकी वसुली, ग्राहकसेवा आदी निकषांवर अधिक गुणवत्तापूर्ण काम करा, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन / प्रकल्प) सचिन तालेवार यांनी दिले.
महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती’ सभागृहामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर), अमित बोकील (सांगली), पुनम रोकडे (पायाभूत आराखडा) यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक (संचालन / प्रकल्प) सचिन तालेवार म्हणाले, ‘वीज बिलापोटी चालू वीज बिलासोबतच थकबाकी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या. ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास उद्युक्त करा. ग्राहकाने वीजबिल भरले नाही तर त्यांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करा. वसुलीत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यांवर प्रशासन कारवाई करेल. याचबरोबर सर्व शासकीय ग्राहक व वितरण रोहित्रांना शंभर टक्के टीओडी स्मार्ट मीटर लावा. टीओडी स्मार्ट मीटर हे आधी वापर मग बिल भरा या तत्वावर काम करणार असून याबाबत ग्राहकांशी संवाद वाढवत टीओडी स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगा.
टीओडी स्मार्ट मीटरच्या माहितीचे नियमित विश्लेषण करत वीज चोरांवर कारवाई करा. नवीन वीज जोडणी तात्काळ द्या. वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना कमी करा. यंत्रणेची नियोजित देखभाल दुरुस्ती करा त्याबाबत ग्राहकांना माहिती द्या. कोणतेही काम करताना ग्राहकास केंद्रित ठेवा. शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत तात्काळ जोडणी द्या. वाढते वीज ग्राहक व वीज मागणी लक्षात घेत आवश्यक तेथे नवीन यंत्रणा उभी करण्याचे प्रस्ताव द्या. आवश्यक तेथे रोहित्रे क्षमता वाढ करा. यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे चांगल्या दर्जाची करा, असे आदेश संचालक (संचालन / प्रकल्प) सचिन तालेवार यांनी दिले.
पुनर्रचनेमुळे कर्मचाऱ्यांचे वर्क लाईफ बॅलन्स होणार
महावितरणमधील पुनर्रचनेमुळे वीज अधिकारी व कर्मचारी यांचे वर्क लाईफ बॅलन्स होण्यास मदत होणार आहे. तसेच ग्राहकांना ही अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्मार्ट वर्किंग सर्वांनी अंगीकारणे आवश्यक आहे. पुनर्रचनेनुसार काम करताना अडचणी आल्यास त्या वरिष्ठांच्या मदतीने सोडवा. हा बदलाचा काळ सर्वांनी सकारात्मक पद्धतीने घ्यावा, असे आवाहन संचालक (संचालन/ प्रकल्प) सचिन तालेवार यांनी केले.
कोल्हापूर परिमंडल कार्यालयातील सौर प्रकल्पाचे उद्घाटन
महावितरणचे संचालक (संचालन/ प्रकल्प) सचिन तालेवार यांच्या हस्ते कोल्हापूर परिमंडल कार्यालयाच्या छतावरील सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर परिमंडलa व मंडल कार्यालयाच्या छतावर ५५० वॅटचे एकूण १४६ सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. यांची एकत्रित क्षमता ८० किलोवॅट असून यातून महिना सरासरी ९६०० युनिटची वीज निर्मिती होईल. या प्रकल्पास सुमारे ३२ लाख इतका खर्च आला असून हे पैसे अंदाजे चार ते पाच वर्षात (पे बँक पिरीयड) फिटतील. सध्या या कार्यालयाचे बिल महिना ३५-५० हजार दरम्यान येते ते यामुळे शुन्य होणार आहे.
वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करा, ग्राहकांना अधिक चांगली सेवा द्या
|