ताज्या बातम्या

महाराष्ट्र चेंबर आणि सेलको फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार

Memorandum of Understanding between Maharashtra Chamber and SELCO Foundation


By nisha patil - 1/17/2026 5:38:29 PM
Share This News:



मुंबई: ग्रामीण भागातील उद्योजकतेला बळ देण्यासाठी आणि शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) आणि देशातील प्रतिष्ठित 'सेलको फाउंडेशन' (SELCO Foundation) यांच्यात  सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. ग्रामीण भागातील सामाजिक नवोपक्रम आणि शाश्वत विकासासाठी  महाराष्ट्र चेंबरच्या “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले. 


या कराराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात नवीन उद्योजक तयार करणे, शाश्वत ऊर्जेच्या मदतीने स्थानिक व्यवसायांना चालना देणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणे हा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दोन्ही संस्था आता एकत्रितपणे काम करणार  असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिली. 
“गाव तिथे उद्योजक” ही संकल्पना केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी या करारामुळे एक ठोस आणि प्रभावी सुरुवात झाली आहे, असा विश्वास याप्रसंगी उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच नियुक्ती झालेले  मिथिलेश देसाई यांनी सामंजस्य करार करण्यासाठी  महत्वपूर्ण भूमिका निभावली. देसाई यांचा सेलको फाउंडेशनसोबतचा दांडगा अनुभव आणि ग्रामीण उद्योजकता क्षेत्रातील त्यांचे कार्य या करारामध्ये निर्णायक ठरले. त्यांच्या प्रभावी समन्वयामुळेच या  दोन मोठ्या संस्था एकत्र येऊ आल्या. 
सेलको फाउंडेशनच्या इंडिया हेड  हुडा जाफर यांनी  महाराष्ट्र चेंबरच्या सहकार्याने राज्यातील प्रत्येक गावात उद्योजक घडवणे, शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक उद्योग वाढवणे, ग्रामीण स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे महत्वपूर्ण काम होणार असल्याचे सांगितले. 
या प्रसंगी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,   मिथिलेश देसाई, सेलको फाउंडेशनच्या इंडिया हेड हुडा जाफर, आणि त्यांची टीम उपस्थित होती.                                                      


महाराष्ट्र चेंबर आणि सेलको फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार
Total Views: 113