बातम्या
महिला बाइक रॅलीतील सहभागी महिलांकडून कोल्हापूर प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश
By nisha patil - 9/27/2025 3:48:49 PM
Share This News:
महिला बाइक रॅलीतील सहभागी महिलांकडून कोल्हापूर प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश
रॅलीला पावसाचा व्यत्यय पण महिलांचा उत्साह दखलपात्र
कोल्हापूर दि 27 वेळ सकाळ आठची . . . . पावसाच्या कोसळणाऱ्या धारा . . .या कोसळणाऱ्या संततधारेत एक एक करीत महिला दसरा चौकात उपस्थित राहू लागल्या. दसरा महोत्सवांतर्गंत आज जिल्हाप्रशासनातर्फे महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पडत्या पावसात या रॅलीसाठी सुमारे अडीचशे ते तीनशे महिलांनी दसरा चौक येथे आपली उपस्थिती दर्शवली. पावसामुळे रॅलीचा निर्णय रद्द करण्यात आला तथापी महिलांनी दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये आपल्यातील अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करीत, पर्यावरण रक्षणाचा अतिशय महत्त्वपूर्ण संदेश दिला तसेच आरोग्यासाठी प्लास्टिक किती घातक आहे याचे पथनाट्याद्वारे सादरीकरण केले .
महिलांच्या या कलागुणांवर थाप टाकण्यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयेन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते .
दरवर्षी प्रमाणे विविध वेशभूषेत, विविध प्रकारच्या माहितीचे फलक घेवून महिला दसरा चौकात उपस्थित होत्या. यावेळी प्लास्टीक मुक्त कोल्हापूर या कार्यक्रमासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, सी.पी.आर. हॉस्पिटल परिचारिका, आरोग्य परिचया प्रशिक्षण केंद्र, शहाजी लॉ कॉलेज,श्री करवीर निवासिनी ग्रुप, इंडियन पोलीस मित्र,ट्राफिक, होमगार्ड, लगोरी फाउंडेशन, माध्यमिक शिक्षण विभाग, जागर स्त्रीशक्ती ग्रुप,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील महिलांनी आपले योगदान दिले.
स्वच्छता आणि नशामुक्तीचा संदेश देणारी सायकल रॅली
दिडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत नशामुक्त कोल्हापूर , स्वच्छता सेवा अभियान तसेच प्लास्टिक मुक्त कोल्हापूर ही संकल्पना घेऊन अभियान राबविण्यात येत आहे .या अभियानाचे औचित्य साधून नुकतीच स्वच्छता व नशा मुक्तीचा संदेश देणारी सायकल रॅली दसरा चौकातून काढण्यात आली होती . यामध्ये विविध वयोगटातील नागरिक सामील झाले .विशेषता सात वर्षांच्या लक्ष घाटगे यांने या सायकल रॅलीत सहभागी होवून सर्वांची मने जिंकली .यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ डी .सी कुंभार ,सायकल क्लबचे अध्यक्ष नितीन शिंदे , सचिन पांडव , बाळासाहेब कांबळे , मनपाचे कृष्णा पाटील आदी उपस्थित होते .
महिला बाइक रॅलीतील सहभागी महिलांकडून कोल्हापूर प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश
|