बातम्या
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!
By nisha patil - 7/11/2026 10:45:17 PM
Share This News:
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!
भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणार
कसबा बावडा गोकुळ दूध संघातील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार एल्गार पुकारला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कसबा बावडा येथील भगवा चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.
या आंदोलनात कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांचा निर्णय हा शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.
सोमवारी २५ हजारांचा धडक मोर्चा
या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की, "येत्या सोमवारी कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील २५ हजारांहून अधिक नागरिक व दूध उत्पादक शेतकरी एकवटून भव्य मोर्चा काढणार आहेत." या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला ठणकावून इशारा दिला जाणार आहे.
या वेळी बावड्यातील सर्व आजी-माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी तसेच कसबा बावडा व लाईन बाजार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे गोकुळच्या वर्तुळात आणि स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!
|