मनोरंजन
‘मिरांडा वॉर्निंग’ आजपासून चित्रपटगृहांत
By nisha patil - 11/28/2026 2:10:49 PM
Share This News:
रहस्य, संशय अन् अनपेक्षित धक्क्यांचा थरार!
‘मिरांडा वॉर्निंग’ आजपासून चित्रपटगृहांत ; चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी
कोल्हापूर प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर : रहस्य, संशय आणि थरार यांचा अनोखा संगम असलेला ‘मिरांडा वॉर्निंग’ हा नवा मराठी चित्रपट आज, २७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. प्रत्येक चेहऱ्यामागे दडलेले रहस्य, प्रत्येक व्यक्तीवर निर्माण होणारा संशय आणि कथानकातील अनपेक्षित वळण यामुळे या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘इथला प्रत्येक चेहरा एक नवीन रहस्य लपवून बसलाय... कोणाचा अंदाज खरा ठरणार आणि कोण कोणाला चकवा देणार?’ या संवादातून चित्रपटातील गुंतागुंतीच्या कथानकाची कल्पना येते. नेमके सत्य काय, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाच्या चेहऱ्यामागे कोणते रहस्य दडले आहे, अशा प्रश्नांची उत्सुकता ट्रेलरमुळे निर्माण झाली आहे.
चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सचिन धोत्रे यांच्यासह अन्य कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रहस्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्यक्तिरेखा, संशयाचे धागेदोरे आणि प्रत्येक टप्प्यावर मिळणारे अनपेक्षित धक्के हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन धोत्रे यांनी केले असून, कथेची आणि लेखनाची जबाबदारी रविंद्र मठाधिकारी व सयाली मठाधिकारी यांनी सांभाळली आहे. सचिन धोत्रे, एम. बी. अळ्ळीकट्टी आणि नागेश धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अल्ट्रा जकासचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्र यांच्या वतीने हे चित्रपट सादर करण्यात येत आहे. सटनम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज या निर्मिती संस्थांच्या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग असून, सनशाईन स्टुडिओजतर्फे चित्रपटाचे वितरण करण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत!
या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच एका स्तुत्य सामाजिक निर्णयाचीही घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर या चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा निर्माते आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी केली आहे.
‘मिरांडा वॉर्निंग’ आजपासून चित्रपटगृहांत
|