विशेष बातम्या

मिशन ‘दृष्टी’ची पृथ्वीवर अचूक नजर

Mission Drishti keeps a sharp eye on Earth


By nisha patil - 1/19/2026 12:47:55 PM
Share This News:



नवी दिल्ली :- अंतराळ संशोधन क्षेत्रातील खासगी स्टार्टअप ‘गॅलेक्सआय’ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘मिशन दृष्टी’ या नावाने मल्टी-सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. ऑप्टिकल आणि रडार सेन्सर्समधील डेटा एकत्र करून पृथ्वीची अचूक, उच्च दर्जाची छायाचित्रे घेणे हे या उपग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती, पायाभूत सुविधा निरीक्षण, हवामान बदल व पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. २०३० पर्यंत अशा स्वरूपाचे एकूण १० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा गॅलेक्सआयचा मानस असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

गॅलेक्सआयचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुयश सिंह यांनी सांगितले की, या उपग्रहात रडार सेन्सिंग आणि ऑप्टिकल इमेजिंगचे एकत्रीकरण एकाच प्लॅटफॉर्मवर करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रात विकसित झालेला हा भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा उपग्रह ठरणार आहे.
ऑप्टिकल कॅमेऱ्याच्या मदतीने पृथ्वीची बहुकोनीय छायाचित्रे घेण्यात येतील, तर सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) तंत्रज्ञानामुळे ढग, पाऊस किंवा अंधार असतानाही निरीक्षण शक्य होणार आहे. त्यामुळे सर्व हवामानात सातत्यपूर्ण निरीक्षण उपलब्ध होईल. सरकार तसेच संरक्षण क्षेत्रातील ग्राहकांना या माध्यमातून विश्वासार्ह, सतत आणि बहुस्त्रोत माहिती मिळणार आहे.

कोणत्या क्षेत्रांना होणार लाभ?

- संरक्षण व सीमारेषा देखरेख

- आपत्ती व्यवस्थापन व आपत्कालीन प्रतिसाद

- शेती व जलसंधारण

- पायाभूत सुविधा निरीक्षण

- हवामान बदल व पर्यावरण अभ्यास

आकडे बोलतात

- उपग्रहाचे वजन : १६० किलो

- पृथ्वी निरीक्षण उंची : ५०० किलोमीटर

- एकूण उपग्रह : १०

- प्रक्षेपण उद्दिष्ट : २०३० पर्यंत

‘मिशन दृष्टी’ हे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल मानले जात असून, जागतिक पातळीवर पृथ्वी निरीक्षण व डेटा संकलनाच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे


मिशन ‘दृष्टी’ची पृथ्वीवर अचूक नजर
Total Views: 27