बातम्या
दहशतवादी संघटनांकडून ‘एआय’चा गैरवापर; भरती, डीपफेक आणि सायबरहल्ल्यांचा धोका वाढला
By nisha patil - 12/20/2025 1:43:28 PM
Share This News:
जगभरात विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर झपाट्याने वाढत असताना, त्याचा गैरवापर होण्याची भीतीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दहशतवादी संघटना ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन सदस्यांची भरती, डीपफेक प्रतिमा व ऑडिओ तयार करणे तसेच सायबरहल्ले करण्याची शक्यता वाढली आहे, असा गंभीर इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व गुप्तचर संस्थांनी दिला आहे.
आयएसकडून ‘एआय’ वापरण्याचे आवाहन
गेल्या महिन्यात इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित एका संकेतस्थळावर दहशतवादी कारवायांसाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘एआय’ वापरण्यास अतिशय सोपे आहे, असे नमूद करत, या तंत्रज्ञानामुळे भरती व प्रचार अधिक प्रभावी होऊ शकतो, असे त्यात म्हटले होते. गुप्तचर संस्थांना असलेली भीती आता वास्तवात उतरू लागल्याचे संकेत मिळत आहेत.
डीपफेक ऑडिओ आणि बहुभाषिक प्रचार
दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘साईट’ (SITE) संस्थेच्या संशोधकांनुसार, आयएसने आपल्या नेत्यांचे धर्मग्रंथ पठण करतानाचे डीपफेक ऑडिओ रेकॉर्डिंग तयार केले आहे. या संदेशांचे अनेक भाषांमध्ये त्वरित भाषांतर करण्यासाठीही ‘एआय’चा वापर करण्यात येत असून, त्याद्वारे समर्थकांना उठावासाठी आवाहन केले जात आहे.
सोशल मीडियातून चुकीची माहिती
एकेकाळी इराक व सिरियाचा मोठा भाग काबीज करणारा आयएस आता विकेंद्रित दहशतवादी गटांच्या आघाडीच्या स्वरूपात कार्यरत आहे. सोशल मीडियाचा वापर करून भरती व चुकीची माहिती पसरवणे अधिक सोपे झाल्याने, ‘एआय’चा वापर होणे आश्चर्यकारक नाही, असे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बनावट छायाचित्रांमुळे ध्रुवीकरण
अलीकडील काळात दहशतवादी गटांनी इस्त्रायल-हमास युद्धाशी संबंधित रक्तरंजित बनावट छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली होती. बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त इमारती, अनाथ बालके यांचे दृश्य दाखवून संतापाची लाट उसळवण्यात आली. या बनावट कंटेंटचा वापर पश्चिम आशियातील दहशतवादी गटांसह अमेरिका व इतर देशांतील ज्यूविरोधी गटांनीही नवीन सदस्यांच्या भरतीसाठी केल्याचे समोर आले आहे.
जागतिक सुरक्षेसमोरील नवे आव्हान
तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडिया अल्गोरिदमशी जोडले गेलेले ‘एआय’-निर्मित बनावट कंटेंट प्रचंड प्रमाणावर प्रचार करू शकतात, ज्यामुळे भीती, संभ्रम आणि ध्रुवीकरण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘एआय’च्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे हे जागतिक सुरक्षेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
दहशतवादी संघटनांकडून ‘एआय’चा गैरवापर; भरती, डीपफेक आणि सायबरहल्ल्यांचा धोका वाढला
|