ताज्या बातम्या
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा; अपेक्षेपेक्षा कमी हप्ता
By nisha patil - 1/1/2026 12:17:25 PM
Share This News:
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वर्षअखेरीस काहीसा दिलासादायक तर काहीसा निराशाजनक क्षण पाहायला मिळत आहे. चालू वर्ष संपत असतानाच बुधवारी सायंकाळी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाल्याचे दिसून आले.
नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते प्रलंबित असल्याने दोन्ही मिळून 3 हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा लाभार्थी महिलांमध्ये होती. काही ठिकाणी तर जानेवारीत तीन महिन्यांचे एकत्रित 4 हजार 500 रुपये जमा होतील, असेही अंदाज वर्तवले जात होते.
मात्र प्रत्यक्षात सरकारकडून केवळ नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला. डिसेंबर महिना जवळपास संपत आलेला असताना पूर्ण रक्कम न मिळाल्याने काही महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरीही खात्यात पैसे जमा झाल्याने अनेक लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची अंतिम मुदत आज, 31 डिसेंबर रोजी संपत आहे. ज्या महिलांनी वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा; अपेक्षेपेक्षा कमी हप्ता
|